मुख्यमंत्र्यांकडे मागणी : आरमोरी तहसीलदारांना भाजपचे निवेदनआरमोरी : मागील दीड महिन्यांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जिल्ह्यात दुष्कासदृश परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे शासनाने गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी आरमोरी भाजपच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.मागील दीड महिन्यांपासून जिल्हा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी टाकलेले पऱ्हे व आवत्या पूर्णत: करपले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी कृषिपंप व आॅईल इंजिनच्या माध्यमातून रोवणी केली, अशा शेतकऱ्यांच्याही पिकाला वाळवी लागून रोवणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतामध्ये भेगा पडल्या असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यंदा अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेऊन जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने तालुका महामंत्री प्रदीप हजारे, कुशल कारागीर आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रणव गजपुरे, तालुका उपाध्यक्ष चांगदेव काळबांधे, जिल्हा सरचिटणीस सदानंद कुथे, गोपाल भांडेकर, संतोष गोंदोळे यांनी केली आहे. शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदार मनोहर वलथरे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी भाजपचे हरिहर कापकर, पुंडलिक दहिकर, अमोल गजापुरे, मधुकर टिचकुले, विश्वनाथ कुकुडकर, सुखदेव ठाकरे, रोशनी बैस, रेखा कुकुडकर, शर्मिला मसराम, कुंदा मेश्राम, राऊत व कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा
By admin | Published: August 05, 2015 1:31 AM