जनजागृतीवर भर : जिल्हा परिषदेत पोषण चळवळ कार्यशाळेतील सूर गडचिरोली : बालकांच्या योग्य पोषणाविषयीची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचविल्यास कुपोषणातून बालकांची मुक्तता करणे सहज शक्य होईल. कुपोषणमुक्तीच्या या चळवळीत प्रशासकीय यंत्रणेबरोबर समाजाचाही सहभाग करून घ्यावा, त्यासाठी कुपोषणमुक्तीला लोक चळवळ बनवावी, असा सूर कार्यशाळेला उपस्थित मार्गदर्शकांनी व्यक्त केला.राजमाता जिजाऊ मिशन व जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या सभागृहात गुरूवारी पोषण चळवळ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजमाता जिजाऊ मिशनचे उपसंचालक अशोक पावडे, एमआयएसचे व्यवस्थापक उल्हास खळेगावकर, आयईसीचे सल्लागार प्रफुल्ल रंगारी उपस्थित होते. कार्यशाळेला महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, डॉ. सुरेश मोटे, पिंपळे यांच्यासह तालुका बालविकास अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका आदी उपस्थित होत्या.यावेळी मार्गदर्शन करताना अशोक पावडे म्हणाले की, बाळाच्या पोषणासाठी प्रत्येक कुटुंबाला जागृत करणे आवश्यक आहे. बाळाला किती पोषण आहार लागतो, याची माहिती देणे गरजेचे आहे. बालकांसाठी आवश्यक असलेला पोषण आहार, त्याची उंची, वजन, घ्यावयाची काळजी याविषयीचे छोटे पॉम्प्लेट प्रत्येक कुटुंबाच्या स्वयंपाक खोलीत चिकटवावे, अशा प्रकारचा प्रयोग काही जिल्ह्यांमधील अंगणवाडींनी केला आहे व तो यशस्वी झाला आहे. उल्हास खळेगावकर यांनी लहान बाळाचे मन चंचल असते, त्यामुळे ते नेहमी हालचाल करीत राहते. त्यामुळे त्याचे शरीर जरी लहान असले तरी त्याला जास्त कॅलरीजची गरज भासते. त्याच्या पोटाचा आकार लहान असल्याने त्याला अधिकवेळा खाऊ घालावे, कुपोषित बालकांकडे लक्ष देण्याबरोबरच जी बालके सुदृढ आहेत, ती बालके कुपोषणाच्या श्रेणीत येणार नाही, याची खबरदारी घ्यावी, सकाळी उठल्यानंतर बाळाला चहा किंवा बिस्कूट ऐवजी घरी बनविलेले पदार्थ खाऊ घालावे, असे मार्गदर्शन केले. प्रफुल्ल रंगारी यांनी मार्गदर्शन करताना प्रसार व प्रचाराच्या माध्यमातून माहिती जनतेपर्यंत पोहोचविली जाते. मात्र ती जोपर्यंत स्वीकारली जात नाही, तोपर्यंत बदल होत नाही. कुपोषणाची माहिती पालकांनी स्वीकारली पाहिजे, यासाठी प्रयत्न करावा, कुपोषणमुक्तीसाठी काही नाविण्यपूर्ण उपक्रम असतील तर त्याची वरिष्ठस्तरावर दखल घेतली जाईल, असे मार्गदर्शन केले. (नगर प्रतिनिधी)अक्षयपात्र व मडका फ्रिज लाभदायकत्र्येंबकेश्वर येथील अंगणवाडी सेविकेने अंगणवाडीच्या बाहेर अक्षयपात्र (भाजीपाल्याची टोपली) ठेवले. या अक्षयपात्रात गावातील नागरिक येऊन भाजीपाला, फळे टाकत आहेत. त्यामुळे त्या अंगणवाडीला पोषण आहार बनविण्यासाठी कधीच अन्नधान्य व भाजीपाल्याची कमतरता भासत नाही. तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकेने मडका फ्रिज तयार केला आहे. लहान-मोठ्या आकाराचे दोन रांजन घेतले. मोठ्या रांजनामध्ये लहान रांजन ठेवले. लहान रांजनामध्ये भाजीपाला ठेवला. दोन रांजनाच्या रिकाम्या जागेत रेती व पाणी टाकले. रेती व पाण्याच्या थंडाव्यामुळे रांजनातील भाजीपाला तीन ते चार दिवस ताजा राहत आहे.
कुपोषणमुक्तीला लोकचळवळ बनवा
By admin | Published: May 27, 2016 1:23 AM