ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. 10 - मोदी सरकारच्या 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे अवैधरित्या व्यवसाय करणा-यांचे धाबे चांगलेच दणादणाले आहे. धनाढ्यांचा काळा पैसा पांढरा करण्याची गरज ओळखून शहरातील सोने-चांदीच्या व्यापारी प्रती 10 ग्रॅम सोने 34 हजार रुपयांवर पोहोचलेले असताना, 50 हजार रुपयांच्या दराने 3 किलो सोने विकत असल्याची चर्चा सुरू आहे.
व्यवहार तोट्याचा असला तरी अवैध पैसा नियमित करण्यासाठी धनाढ्यांनी यांसारख्या अनेक शक्कल लढवायला सुरूवात केली आहे. काळा पैसा रोखण्यासाठी केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्या, मात्र या निर्णयाने विविध व्यवसायातून अवैधरित्या बक्कळ पैसा कमावणा-यांना सळो की पळो करुन सोडले आहे.
यामुळे काळा पैसा पांढरा करण्यासाठी धनाढ्यांनी सराफांकडे धाव घेत, सोने-चांदी खरेदीचे मागील तारखेचे बिल देण्याच्या अटीवर किमान 3 किलो सोने 50 हजार रुपयांच्या दराने खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. याद्वारे सराफांनी अवैध पैसा नियमित करण्याचा ठेकाच घेतल्याची चर्चादेखील शहरात सुरू आहे.