गडचिरोली : जिल्ह्यातील मलेरियाच्या आजारासाठी संवेदनशील क्षेत्र असणाऱ्या १५ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांमध्ये मलेरिया तपासणीची मोहीम सुरू असतानाच भामरागड तालुक्यातील कवंडे गावात मलेरियाचा उद्रेक झाला. गावातील तपासणी केलेल्या १५२ लोकांपैकी ५६ जण मलेरिया पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे आरोग्य विभागाला चांगलीच धावपळ करत आपले लक्ष या गावावर केंद्रित करावे लागले. आता साथ नियंत्रणात असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांनी सांगितले.
जंगलालगत असलेल्या गावांमुळे भामरागड तालुक्यात मलेरियाचा प्रकोप सर्वाधिक असतो. त्यामुळे सामूहिक तपासणी मोहीम सुरू असतानाच मिडदापल्ली उपकेंद्रांतर्गत ९ ते १४ डिसेंबरपर्यंत १८२ लोकसंख्या असलेल्या मौजा कवंडे गावात आशा वर्कर सगणी वड्डे, आरोग्य कर्मचारी बांबोळे यांनी घरोघरी जाऊन १५२ लोकांचे रक्तनमुने घेतले. यात ५६ लोकांना मलेरियाची लागण झाल्याचे आढळले. त्यामुळे आरोग्य विभागाने जिल्हा व तालुका आरोग्य यंत्रणा कामाला लावली. तीन दिवसात संपूर्ण गावातील मलेरियाची साथ नियंत्रणात आणली आहे.
मलेरियाच्या सामूहिक तपासणीचा आढावा घेण्यासाठी ८ डिसेंबरला मलेरियाचे विभागीय संचालक डॉ.ए.जी.अलोने, वरिष्ठ विभागीय संचालक बी.आर. माने यांनी आपल्या चमूसह लाहेरी व कियर गावांना भेट दिली होती.
रजेवर गेलेल्या डाॅक्टरांना बोलविले परत
भामरागड तालुका मुख्यालयापासून २८ कि.मी. अंतरावर येत असलेले कवंडे हे गाव छत्तीसगड सीमेवरील शेवटचे गाव आहे. सदर गावात पोहोचण्यासाठी रस्ता नाही. आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी मिळदापल्ली उपकेंद्र कार्यरत आहे. याठिकाणी कार्यरत डॉ. स्नेहा टिंगने मागील १५ दिवसांपासून रजेवर होत्या. त्यांना तत्काळ रजा रद्द करून बोलविले. १८ रोजी त्या कामावर रुजू झाल्या. नागरिकांना मलेरियासंदर्भात मार्गदर्शन करून मच्छरदाण्याही वाटल्याचे डॉ. भूषण चौधरी यांनी सांगितले.
का वाढतोय मलेरियाचा प्रकोप?
भामरागड तालुका जंगल, नदी-नाल्यांचा प्रदेश असल्याने ‘इंडोमिक झोन’मध्ये मोडतो. त्यमुळे येथे नेहमीच एक-दोन मलेरियाचे रुग्ण आढळून येतात. सध्या कवंडे गावात डासांना आश्रय देणारे पााण्याचे डबकेही नाही. परंतु हे गाव टोकावर असल्याने छत्तीसगडचे नागरिक सीमेवरील या गावात नेहमी जाणे-येणे करतात. त्यामुळे एखादा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तरी आजार पसरत जाऊ शकतो, असे डॉ. चौधरी म्हणाले.