कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्य सेवा आहे.
विटा बनविण्याच्या कामास गती
देसाईगंज : उन्हाळ्याला सुरुवात झाली असल्याने घर बांधकामाला ग्रामीण भागात वेग आला आहे. देसाईगंज तालुक्यात विटांची निर्मिती केली जाते. हिवाळ्यात विटा बनविण्यासाठी पाेषक वातावरण असल्याने विटा बनविण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे.
गोरक्षण संस्थेच्या निर्मितीची मागणी
गडचिरोली : गडचिरोली शहरात गोरक्षण संस्था नाहीत. त्यामुळे अनेकदा बेवारस जनावरे, तसेच कत्तलीसाठी जात असलेले जनावर पकडून चंद्रपूर जिल्ह्यात लोहारा येथे पाठवावे लागतात. गोरक्षण संस्था निर्माण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
जि.प.समोरील अतिक्रमण हटवा
गडचिरोली : जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूला काही दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. मात्र, या दुकानदारांवर कोणतीही कारवाई बांधकाम विभाग, तसेच नगरपरिषद प्रशासन करीत नसल्याने, या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा पकडून दुकाने थाटली जात आहेत. या परिसरात आता जिल्हा परिषदेकडून शाॅपिंग काॅम्प्लेक्स उभारले जाणार आहे. मात्र, महसूल विभागाच्या जागेवरील अतिक्रमण कायम आहे.
पांदण रस्ते मोकळे करण्याची मागणी
गडचिरोली : शेतीकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पांदण रस्ता म्हटले जाते. या पांदण रस्त्यांवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शेतीकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. सर्व्हे करून या मार्गाचे रोहयोच्या माध्यमातून बांधकाम करणे गरजेचे झाले आहे.
रस्त्यावर आलेली झाडे तोडण्याची मागणी
रांगी : लोहारा ते रांगी, पिसेवडधा ते रांगी या रस्त्यावर अनेक झाडे रस्त्यावर आहेत. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालविताना अडचण येते. वनविभागाने या झाडांची तोड करावी, अशी मागणी आहे. मात्र, याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
केरोसिनचा पुरवठा वाढविण्याची मागणी
एटापल्ली : राज्य शासनाने शहरी व ग्रामीण भागासाठी केरोसिनचे परिमान निश्चित केले आहे. केरोसीनचा कोटा कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक अडचणीत आले आहेत. दुर्गम भागातील गावांमध्ये बरेच दिवस वीज राहत नाही. त्यामुळे नागरिकांना केरोसिनचा पुरवठा वाढविण्याची मागणी आहे.
दिभना मार्गाचे रुंदीकरण करा
गडचिरोली : वनविभागाचा नाका ते दिभना मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गाची सध्या दुरवस्था झाली असल्याने दुरुस्तीसह रुंदीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी
गडचिरोली : जिल्ह्यातील बहुतांश मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सदर खड्डे बुजविण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. बांधकाम विभागाने याकडे वेळीच लक्ष घालून खड्डे बुजवावे, अशी मागणी आहे.
बँकअभावी विकासावर परिणाम
गडचिरोली : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा नाहीत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना अडचण निर्माण होत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ग्रामीण भागात शाखा स्थापन करण्याचे आदेश द्यावे.
दूध शीतकरण केंद्राची इमारत बेवारस
अहेरी : तालुक्यातील आलापल्ली नजीक असलेल्या नागेपल्ली येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राची इमारत बेवारस स्थितीत आहे. लाखो रुपये खर्चून सदर इमारत बांधण्यात आली. मात्र, या ठिकाणी यंत्रसामुग्री आणण्यात आली नाही. यावर खर्च केलेले लाखाे रुपये पाण्यात गेले आहेत.
येवली येथे जलद बसचा थांबा द्या
गडचिरोली : येथून जवळच असलेल्या येवली येथे जलद बस थांबा आहे. मात्र, गडचिरोली आगाराच्या बसगाड्या व्यतिरिक्त इतर आगारांच्या जलद बसगाड्या येथे थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांना गडचिरोली आगारात बसगाडी बदलावी लागत आहे. त्यामुळे येथे जलद बस थांबा देण्याची मागणी होत आहे.
मुद्रांक विक्रीत नागरिकांची लूट
गडचिरोली : विविध कामांसाठी लागणाऱ्या मुद्रांकांची विक्री शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने सुरू आहे. १०० रुपये किमतीचे मुद्रांक ११०, ५०० रुपयांचे मुद्रांक ५५० रुपयांना विकले जात आहे. मुद्रांक विक्रेत्यांना मुद्रांकाच्या किमतीवर कमिशन मिळत असल्याने, त्यांना आगाऊचे पैसे देण्याची गरज नाही.
डिजिटल बॅनरमुळे पेंटर झाले बेराेजगार
सिरोंचा : संगणकाद्वारे विविध मल्टिकलरचे आकर्षक बॅनर मशीनद्वारे बनविण्यात येतात. ते कमी किमतीत कमी वेळात उपलब्ध होतात. त्यामुळे विविध रंगांचे डबे व ब्रश घेऊन दिसणारे पेंटर आता दिसेनासे झाले आहेत.
लोंबकळणाऱ्या तारांमुळे वाढला धोका
धानोरा : शहरातील मुख्य बाजारपेठ, तसेच इतरही वॉर्डांमध्ये विजेच्या तारा लोंबकळत आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी वीज विभागाकडे तक्रारही केली आहे. मात्र, वीज वितरण कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
सट्टापट्टीसाठी इंटरनेटचा वापर
अहेरी : तालुक्यासह जिल्हाभरातील शहरी भागात सट्टापट्टीचे नंबर पाहण्यासाठी मोबाइलद्वारे इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. अनेक लोक भ्रमणध्वनीवर इंटरनेटद्वारे सट्टापट्टीचे नंबर शोधताना दिसून येतात. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
गोगाव-पिपरटोला मार्गाची दुरुस्ती करा
गडचिरोली : तालुक्यातील गोगाव-पिपरटोला या मार्गाची अनेक दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. हा महत्त्वाचा मार्ग असतानाही दुरुस्तीकडे दुर्लक्ष हाेत आहे.
आलापल्ली येथे गतिरोधक निर्माण करा
आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु या मार्गाने भरधाव वाहनांचे आवागमन असते. येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांचेही आवागमन असते. आलापल्ली शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.