वनखात्याचे दुर्लक्ष : पाच दिवस उलटले; नागपूर पासिंगचे होते वाहनआलापल्ली : आलापल्ली-अहेरी मुख्य मार्गावरील नागेपल्ली येथील लोकबिरादरी प्रकल्पाजवळ मुख्य मार्गावरून २३ फेब्रुवारी रोजी मालवन जातीच्या सापाची तस्करी करण्यात आली होती. सदर साप वाहनात टाकून नेताना काही नागरिकांनी बघितले होते. या घटनेला पाच दिवसांचा कालावधी उलटूनही मालवन सापाची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेण्यात वन विभागाला यश प्राप्त झाले नाही. मालवन जातीचे साप गुप्तधनाचा शोध घेण्याच्या कामात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे गुप्तधनाचा शोधकर्ते या सापासाठी लाखो रूपये किमत मोजण्यासाठी तयार असतात. सदर साप दोन तोंडाचे असल्याचा समज नागरिकांचा असल्याने हा साप दिसताच त्याला बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. मात्र काही वेळातच सिमेंट रंगाच्या स्कारपीओ वाहनातून आलेल्या युवकांनी सदर सापाला काठीने पकडून त्याला वाहनामध्ये टाकले व घेऊन गेले. मालवन सापाला ज्या वाहनात नेण्यात आले ते वाहन नागपूर जिल्ह्याच्या पासींगचे होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्या आलापल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याने मालवन सापाची तस्करी करण्यात येत असल्याचेही बोलले जात आहे. काही नागरिकांनी मालवन सापाची तस्करी झाल्याबद्दलची तोंडी माहिती वनकर्मचारी व अधिकाऱ्यांना दिली. मात्र या वाहनाचा व तस्करांचा शोध घेण्याचा प्रयत्न वन विभागाने केला नाही. त्यामुळे पाच दिवसानंतरही तस्करांचा शोध लागलेला नाही. वन विभागाच्या या सूस्त धोरणामुळे सापांची तस्करी आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)
मालवन तस्करीचा तपास थंडच
By admin | Published: February 28, 2016 1:31 AM