लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : छोट्या-छोट्या गावतलावांच्या, अर्थात माजी मालगुजारी (मामा) तलावांच्या बाबतीत गोंदिया-भंडारा या जिल्ह्यांप्रमाणेच गडचिरोली जिल्हाही समृद्ध आहे. जिल्हाभरात अशा १६४५ मामा तलावांची नोंद आहे. त्यातील पाण्यातून २५ हजार १९५ हेक्टर शेतीला सिंचन करण्याची क्षमता आहे. मात्र, प्रत्यक्षात यातील बहुतांश तलाव सध्या शेतीच्या सिंचनाऐवजी केवळ गावातील कपडे धुणे आणि गुरांच्या अंघोळीपुरते मर्यादित झाले आहेत. अपेक्षित सिंचनासाठी पुरेसा निधी शासनाकडून उपलब्ध होण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेचा लघुपाटबंधारे विभाग या तलावांचे व्यवस्थापन पाहते. पूर्वी या तलावातील पाण्याचा उपयोग शेतीसाठीच नाही, तर गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही केला जात होता, पण आता त्यातील पाणी शुद्ध राहिलेले नाही. गावातील महिलावर्ग या पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी करतात.
निधी मिळाल्यास वाढू शकते सिंचन
- या जिल्ह्यात बिगर आदिवासी क्षेत्रातील मामा तलावांमधील साठवण क्षमता वाढविण्यासाठी तलावांचे खोलीकरण, गेट व कालव्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुरेशा निधीची गरज आहे.
- हा निधी नसल्यामुळे या तलावांमधून क्षमतेएवढे सिंचन होऊ शकत नाही. वास्तविक मूळ क्षमतेनुसार या तलावांमध्ये ४६ दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे, पण गाळ आणि गेट फुटलेले असल्यामुळे तेवढा पाणीसाठा या तलावांमध्ये होत नाही.
साठवण क्षमता घटलीया पाण्याचा सिंचनासाठी वापर करताना पहिला हक्क अजूनही संबंधित मालगुजार किंवा त्यांनी ज्यांना हक्क दिले त्यांचा आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना या पाण्याचा वापर करता येतो, पण १६४५ मामा तलावांपैकी ३० ते ४० टक्के तलावांमध्ये गाळ साचलेला आहे. त्याचा उपसा झाला नसल्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे.