गडचिरोली : जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात वाघाचा धुमाकूळ सुरू असताना दक्षिणेकडील तालुक्यांत बिबट आणि अस्वलाचे हल्ले होत आहेत. या घटनांमंध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शुक्रवारी चामोर्शी तालुक्यातील इल्लूर येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी उघडकीस आली. त्यापूर्वी अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील एका गुराख्यावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले. वन्यजीव सप्ताहाच्या सुरुवातीलाच वन्यजीवांचा धुमाकूळ सुरू झाल्याने वनविभागापुढे पेच निर्माण झाला आहे.
बिबट्याच्या हल्ल्यातील मृत शंकर गंगाराम चिताडे (५८) हे इल्लूर गावालगत असलेल्या जंगलात गुरुवारी सकाळी काड्या आणण्यासाठी गेले होते. वाकून काड्या वेचत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला व जंगलात ओढत नेऊन लचके तोडले. ते घरी न आल्याने शुक्रवारी सकाळी शोध घेतला असता बिबट्याने त्यांना ठार केल्याचे दिसले. त्यांचे शीर धडावेगळे आणि एक हात तोडलेला होता.
नागरिकांमध्ये वनविभागप्रति तीव्र रोष
आष्टी परिसरातील बिबट्याच्या हल्ल्याची ही पाचवी घटना आहे. आतापर्यंत दोघांचा मृत्यू आणि तिघे जखमी झाले आहेत. पेपरमिल परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गुरुवारी दोन पिंजरे लावण्यात आले. परंतु बिबट्या पिंजऱ्यात न अडकता त्याने जंगलात आलेल्या इसमाला ठार केले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये वनविभागप्रति तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. इल्लूर गावालगत असलेल्या जंगलातही पिंजरे लावावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
आलापल्लीचे उपविभागीय वनाधिकारी (वन्यजीव) राहुलसिंग टोलिया, चौडमपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी.एम.लांडगे, मार्कंडाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रसंगी मृताच्या कुटुंबीयांना २० हजार रुपयांची तत्काळ मदत देण्यात आली.
अस्वलाचा गुराख्यावर हल्ला
अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील नरसिमा व्यंकटी चौधरी (५५) हा गुराखी गुरुवारी सकाळी जंगलात गाई चारण्यासाठी गेला होता. दुपारी ३ वाजताच्या सुमारास अस्वलाने त्याच्यावर हल्ला केला. त्याला प्रथम कमलापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.