आरमोरी (गडचिरोली) : बकऱ्यांसाठी चारा आणण्यास आपल्या सहकाऱ्यांसोबत जंगलात गेलेल्या व्यक्तीचा वाघाने बळी घेतल्याची घटना मंगळवारी सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास कक्ष क्रमांक ६७ मध्ये घडली. पुरुषोत्तम वासुदेव सावसागडे (५५ वर्ष) असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. गेल्या पाच दिवसात आरमोरी तालुक्यात वाघाने तिसरी शिकार केली आहे.
आरमोरी तालुक्यातील रवि येथील पुरुषोत्तम वासुदेव सावसागडे हे आपल्या घरी पाळलेल्या बकऱ्यांना चारा आणण्यासाठी आपल्या ९ ते १० सहकाऱ्यासोबत रवि गावापासून दोन ते तीन कि.मी. अंतरावरील मुलूर नहराजवळ झुडपी जंगल असलेल्या कक्ष क्रमांक ६७ मध्ये गेले होते. त्या ठिकाणी वाघाच्या येण्याजान्याचा नेहमीचा मार्ग आहे. शिवाय वनविभागाच्या वतीने जंगलात वाघ, अस्वल व इतर हिंस्त्र प्राणी असल्याने कुणीही जंगलात जाऊ नये, असा फलकही लाववेला आहे.
तरीसुद्धा सर्वजण नहरालगत असलेल्या जंगलात झाडाच्या व वेलाच्या बारीक फांद्या तोडत असताना झुडूपात लपून बसलेल्या वाघाने पुरुषोत्तम यांच्यावर हल्ला केला. जवळपास असलेल्या सोबत्यांनी आवाज येताच तिकडे धाव घेऊन आरडाओरड केल्याने वाघ पळाला. मात्र तोपर्यंत पुरुषोत्तम यांचा जीव गेला.
या घटनेची माहिती मिळताच अरसोडा रवि मुलूरचक परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. वडसाचे सहाय्यक वनसंरक्षक धनंजय वायभासे, मनोज चव्हाण, आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, वडसाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे, क्षेत्रसहायक राजेंद्र कुंभारे, वनरक्षक अजय उरकुडे, भारत शेंडे, विकास शिवणकर, शिरउकर, कमलेश गिन्नलवार आणि वन कर्मचाऱ्यांनी व वनमजुरांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
वडसा वनविभागातील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात वाघाचा वावर असल्याने कुणीही जंगलात जाऊ नये. विशेषतः सकाळच्या वेळेस जाऊ नये असे वारंवार वनविभाग आवाहन करीत असताना सुद्धा लोक त्याकडे दुर्लक्ष करून जंगलात जाऊन वाघाचे शिकार होत आहेत. गेल्या ७ आणि ८ ऑक्टोबरला दोन जणांना वाघाने मारले. आजची ही घटना तिसरा बळी आहे.