आरमोरी (गडचिरोली) : साेशल मीडियाची क्रेझ इतकी वाढली की, एखादा प्रसंग जाे-ताे कॅमेराबद्ध करताे. मग ताे प्रसंग गंभीर असाे की काेणताही, याचे भान कुणीच ठेवत नाही. असाच प्रसंग विहीरगाव-लाेहारा मार्गावर साेमवारी घडला. दुचाकी घसरून पडलेल्या मजुराला मदत करण्याऐवजी त्याचे फाेटाे ये-जा करणारे प्रवासी काढत हाेते. गंभीर व्यक्ती वेदनांनी विव्हळत हाेता, तर साेबती मदतीची याचना. माणुसकी हरवलेल्या ह्या घटनेत दुसऱ्याच दिवशी त्या जखमी मजुराचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रुपेश चांगोजी टेंभुर्णे (४५) रा. चामाेर्शी माल असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. आरमोरी तालुक्यातील चामोर्शी माल येथील रुपेश टेंभुर्णे व त्याचा सोबती दिलीप जनबंधू हे दोघेही विहीर बांधणीचे काम आटोपून मोटार सायकलने स्वगावी येत असताना सायंकाळी कुकडी-विहिरगावजवळ मोटारसायकल घसरून जाेरदार अपघात झाला.
अपघातात रुपेश गंभीर जखमी झाला. आपल्या सहकाऱ्याला वेळेत मदत मिळावी म्हणून रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना थांबवून दिलीप मदत मागत होता. मात्र माणुसकी विसरलेले ‘ते’ मदत करण्याऐवजी अपघातग्रस्ताचे फोटो काढत होते; मदतीला कुणीच येत नव्हते. रुपेश हा जखमी अवस्थेत तब्बल एक तास घटनास्थळी पडून होता. शेवटी नातेवाइकांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले आणि जखमी रुपेशला ब्रम्हपुरीच्या एका खासगी रुग्णालयात रात्री ९ वाजता दाखल केले.
व्हेंटिलेटरवर असतानाच त्याची प्रकृती आणखी खालावल्याने मंगळवार २४ मे राेजी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास रुपेशचा मृत्यू झाला. अपघातानंतर लगेच मदत मिळाली असती तर कदाचित रुपेशचा जीव वाचला असता,अशी हळहळ लाेकांनी व्यक्त केली.