मानवधर्माचे सेवक संमेलन : राजू मदनकर यांचे प्रतिपादनदेसाईगंज : समस्त मानवाचे कल्याण हे त्यांच्या वैचारिक परिपक्वतेच्या आधारावर प्रतिबिंबीत होत असते. माणसाने माणसासारखे वागले तर स्वत:सह समाजाचेही कल्याण होते, असे प्रतिपादन प.पू. परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे अध्यक्ष राजू मदनकर यांनी केले. परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर व देसाईगंजच्या वतीने रविवारी येथील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित मानवधर्माच्या सेवक संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सेवक मंडळ नागपूरचे संचालक बालाजी नंदनकर, भगवान लांजेवार, ब्रिजलेकर, नाकतोडे, मारोतराव गोंदोळे, गोविंदराव दोनाडकर, फाल्गुन मानकर, सुधीर भोयर, दिवाकर बेंद्रे, राजू मुनघाटे आदी मान्यवर उपस्थित होते.समस्त मानवाचे कल्याण हे त्यांच्या आचरणावरून स्पष्ट होत असले तरी, आजच्या विज्ञान युगात अज्ञात व अंधश्रध्देचा पगळा आहे. मानव मानवाला जुळला पाहिजे, सध्या जाती धर्मात तेढ निर्माण करून माणसाला माणसापासून तोडण्याचे कार्य धक्कादायक आहे, अशी खंत मदनकर यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमापूर्वी वाईट व्यसन, अंधश्रध्दा, सेवाभाव, निष्काम भावना आदीवर तयार करण्यात आलेल्या देखाव्यांची मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली. संचालन टिकाराम भेंडारकर यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. कावळे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
माणसाने माणसासारखे वागावे
By admin | Published: February 08, 2016 1:28 AM