लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : यावर्षीच्या रब्बी हंगामात सुमारे २३ हजार हेक्टरवर रब्बी पिकांच्या लागवडीचे नियाेजन करण्यात आले आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा वाढला. त्यामुळे रब्बी पिकांचे क्षेत्र वाढेल, अशी अपेक्षा आहे. तसेच यापूर्वीच पेरणी झालेल्या पिकांसाठी अवकाळी पाऊस वरदान ठरला आहे. खरीप हंगामात प्रामुख्याने धान, कापूस, साेयाबीन या पिकांची लागवड हाेते. धान पीक निघाल्यानंतर त्याच धानाच्या बांधीत काही शेतकरी रब्बी हंगामातील पिकांची लागवड करतात. तर काही शेतकऱ्यांकडे रब्बी हंगामासाठी स्वतंत्र जमीन उपलब्ध आहे. खरिपात या ठिकाणी काेणतेही पीक घेतले जात नाही. विविध याेजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहिरींचा लाभ दिला जात आहे. तसेच अत्यंत कमी किमतीत वीज जाेडणी उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे सिंचनाची सुविधा निर्माण हाेऊन दरवर्षी रब्बीचे क्षेत्र वाढत असल्याचे दिसून येत आहे.
६००० हेक्टरवर पेरणी पूर्ण
मागील आठवड्यात प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हाभरात ६ हजार ३४७ हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाल्याची नाेंद आहे. हा कृषी विभागाचा अंदाज असला तरी प्रत्यक्षात या पेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. काही शेतकरी हलके धान निघाल्याबराेबरच पिकांची लागवड करतात. हे पीक आता हिरवेगार झाले आहे. कृषी विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार ४४५ हेक्टरवर भुईमुगाची लागवड करण्यात आली आहे. त्यापाठाेपाठ १४७ हेक्टरवर करडई, ७७ हेक्टरवर जवस व २२ हेक्टरवर माेहरी लागवड करण्यात आली आहे. तेल बियांच्या पिकांच्या उत्पादनांना चांगली मागणी असल्याने काही शेतकरी या पिकांकडे वळत चालला आहे.
लाखाेळी पिकाची सर्वाधिक लागवडधानाच्या बांधीत लाखाेळीचे पीक घेतले जाते. यामध्ये धान पीक कापणीच्या काही दिवसांपूर्वी बांधीत लाखाेळीचे बियाणे टाकले जातात. लाखाेळी पिकासाठी काेणतेही अतिरिक्त खत, मशागत किंवा कीटकनाशकांची फवारणी करावी लागत नाही. अत्यंत कमी खर्चात लाखाेळीचे उत्पादन घेता येत असल्याने अनेक शेतकरी या पिकाची लागवड करतात. गडचिराेली जिल्ह्यात जवळपास ५ हजार हेक्टर क्षेत्रावर लाखाेळी पिकाची लागवड केली जाते.
२ हजार हेक्टरवर मक्याची लागवडजिल्ह्यातील शेतकरी मका पिकाकडे वळत चालला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर व इतर सिंचनाच्या सुविधा आहेत, असे शेतकरी मका पिकाची हमखास लागवड करतात. यावर्षी २ हजार हेक्टरवर मका पिकाची लागवड हाेईल, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. प्रत्यक्षात यापेक्षा अधिक हेक्टरवरही मका पिकाची लागवड हाेऊ शकते. मका पिकाचे उत्पादन चांगले हाेते मात्र भाव अतिशय कमी आहे. भाव वाढल्यास आणखी मक्याचे क्षेत्र वाढू शकते.