मानापूर परिसरात २०१८-१९ या हंगामात तेंदूपत्ता संकलन करण्यात आले. या माध्यमातून अनेकांना राेजगार मिळाला. कामाची मजुरीही मिळाली; परंतु बाेनस मिळाला नाही. मागील वर्षी काेराेना महामारीचे संकट असल्याचे कारण दाखवून दाेन्ही वर्षीच्या बोनसपासून परिसरातील मजुरांना वंचित ठेवण्यात आले. काेराेना लॉकडाऊनमुळे मजुरांना माेठा आर्थिक फटका बसला. त्यातच केलेल्या कामाचा माेबदला न मिळाल्याने मजूर हैराण आहेत. अनेक जण रोजगाराच्या शोधात बाहेर प्रांतात गेले; परंतु त्यांना कोरोनामुळे रिकाम्या हाताने परतावे लागले हाेते. तेव्हापासून मजूर हलाखीचे जीवन जगत आहेत. रखडलेला तेंदू बाेनस देण्याबाबत अनेकदा वन विभाग व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले; परंतु काहीच उपयाेग झाला नाही. त्यामुळे मजुरांमधे तीव्र राेष आहे. रखडलेले बोनस लवकर द्यावे; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काेसरी येथील मजूर प्रकाश लेनगुरे व अन्य मजुरांनी दिला आहे.
मानापूर-देलनवाडीतील मजूर तेंदू बाेनसपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 4:32 AM