लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आदिवासीबहुल १६ जिल्ह्यात मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून कंत्राटी तत्वावर सेवा देत असलेल्या २८१ डॉक्टरांना नियमित आरोग्य सेवेत सामावून घेतले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य सेवा व अभियान आयुक्त डॉ.अनुपकुमार यादव यांनी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिला आहे. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून कंत्राटी तत्वावर सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.राज्यातील आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये गरोदर माता, स्तनपान करणाऱ्या माता आणि ० ते ६ वयोगटातील बालकांना पाडास्तरावर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी १९९५ पासून नवसंजीवनी कार्यक्रम सुरू आहे. त्यासाठी बीएएमएस वैद्यकीय पदवीधरांना मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून कंत्राटी तत्वावर नियुक्त केले आहेत. सद्य:स्थितीत १६ जिल्ह्यांमध्ये २८१ मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील भरारी पथके आदिवासीबहुल भागात बालकांसह आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना आरोग्य सेवा देत आहेत.त्यांना नियमित आरोग्य सेवेत सामावून घेण्याबाबत लोकप्रतिनिधींमार्फत अनेक वेळा तारांकित प्रश्नही उपस्थित करण्यात आले आहेत. याबाबत शासनाने गठीत केलेल्या समितीच्या शिफारसीनुसार नवसंजीवनी योजनेखालील सदर पदे कायमस्वरूपी निर्माण करण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला. मात्र या पदाचे सेवा प्रवेश नियम ठरल्याशिवाय आणि मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबत धोरणात्मक निर्णय झाल्याशिवाय शासनाला प्रस्ताव पाठवू नये, असे सूचविले होते.दरम्यान गेल्या ५ मार्च २०२० रोजी झालेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीत वैद्यकीय अधिकारी (गट-ब) या संवर्गातील पदे निर्माण करून त्या पदांवर सध्या कार्यरत मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार भरारी पथके ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहे, त्या केंद्राच्या मुख्यालयी तिसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद निर्माण करण्याचे आयुक्तांनी प्रस्तावित केले आहे.आरोग्य केंद्रांवरील ताण कमी होणारमानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित सेवेत घेतल्यानंतर त्यांचे काम आदिवासी भागातील उपकेंद्रस्तरावर निर्माण केल्या जात असलेल्या वर्धिनी केंद्रातील कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांकडे सोपविले जाणार आहे. अशा पध्दतीने आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद निर्माण करून या केंद्रावरील कामाचा आणि पर्यवेक्षणाचा ताण हलका करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना आरोग्य सेवेत नियमित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 2:55 PM
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आदिवासीबहुल १६ जिल्ह्यात मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून कंत्राटी तत्वावर सेवा देत असलेल्या २८१ डॉक्टरांना नियमित आरोग्य सेवेत सामावून घेतले जाणार आहे.
ठळक मुद्देआरोग्य अभियान आयुक्तांचा प्रस्तावआदिवासीबहुल जिल्ह्यात देत आहेत सेवा