गडचिराेली : मणीपूर येथे दोन आदिवासी महिलांवर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला. आणि महाराष्ट्राच्या सांगली जिल्हृयातील बेडग या गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान तोडण्यात आली. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ मुव्हमेंट फॉर जस्टीसच्या बॅनरखाली विविध सामाजिक संघटना तसेच भाजप आणि शिवसेना शिंदे गट वगळता इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, युवती व गडचिराेलीकर महिलांनी हजाराेंच्या संख्येत २३ जुलै रोजी रविवारला दुपारी रस्त्यावर उतरून या दाेन्ही घटनांचा निषेध केला. दरम्यान ‘मणिपूर महिलाओ के सन्मान मे गडचिराेली मैदान मे’ अशा घाेषणांनी इंदिरा गांधी चाैक व मुल मार्गावरील परीसर दणाणून गेला.
सर्वप्रथम विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह महिला शहरातील गांधी चाैकात एकत्र गाेळा झाल्या. त्यानंतर मणीपूर व सांगलीतील घटनांचा निषेध करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी भाजपप्रणित केंद्र सरकार तसेच मणिपूर व महाराष्ट्र राज्य सरकारचा घाेषणाबाजीतून जाेरदार निषेध करण्यात आला. त्यांतर चाैकातून मुल मार्गे कारगिल चाैकापर्यंत लाॅंगमार्च काढण्यात आला. दरम्यान यावेळी गडचिराेली शहर व परीसरातील मिळून दिड हजार लाेक रस्त्यावर उतरले हाेते. दरम्यान या आंदाेलनाच्या माध्यमातून गडचिराेलीकरांनी एकतेचा संदेश दिला.सदर लाॅंगमार्च कारगिल चाैकातून परत गांधी चाैकात परतून येथे विसर्जित करण्यात आला. दरम्यान यावेळी निषेध सभा घेण्यात आली. या सभेत प्रमुख १५ पदाधिकाऱ्यांनी आंदाेलकांना संबाेधित केले. शेवटी या चाैकातच पाेलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदन राष्ट्रपतींच्या नावे देण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने मुव्हमेंट फॉर जस्टीसचे राेहिदास राउत, डाॅ. नामदेव किरसान, प्रा. डाॅ. दिलीप बारसागडे, कुसूम अलाम, डाॅ. संताेष सुरडकर, राज बन्साेड, भारत येरमे, ॲड. कविता माेहरकर, प्रशांत मडावी,सदानंद ताराम, हंसराज उंदिरवाडे, शाम रामटेके, देवानंद फुलझेले, ॲड. साेनाली मेश्राम,धर्मानंद मेश्राम, विनाेद मडावी, देवराव चवळे, स्मिता लडके, सुधा चाैधरी, सुरेखा बारसागडे, जयश्री वेळदा, मुनीश्वर बाेरकर, प्रा. गाैतम डांगे, विलास निंबाेरकर आदी पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य व महिला नागरीक उपस्थित हाेते.