प्रतीक मुधोळकर
अहेरी (गडचिरोली) : गरिबीचाच पण सुखाचा संसार होता. तीन चिलेपिले व पती-पत्नी असे पाचजणांचे कुटुंब म्हणजे गोकुळच, पण नियतीची दृष्ट लागली अन् आजारपणाचे निमित्त होऊन या 'सुंदर' घरातील कर्ता व्यक्ती जग सोडून गेला. पतीविरहाच्या दु:खाने कोलमडलेल्या माऊलीने तीन लेकरांना पदराखाली घेत मोठ्या कष्टाने संसार सावरला. मुलांनीही गरिबीची लाज न बाळगत मोलमजुरी केली. यातील धाकट्या लेकाला पोलिस भरतीत पाचवेळा अपयश आले, पण तो मागे हटला नाही. अखेर यावेळी त्याने यश खेचून आणलेच.
परिस्थिती कितीही बिकट असो ध्येय गाठण्याची जिद्द असेल तर यशाला झुकावेच लागते हे कृतीतून दाखविले मनोज धुर्वे याने. तो आलापल्ली गावचा. २९ वर्षांच्या या उमद्या तरुणाची गडचिरोली पोलिस दलात शिपाई पदावर निवड झाली आहे.
तो लहान असताना वडील सुंदरललाल यांचे आजारपणाने निधन झाले. आई रमलाबाईने दु:खाचा डोंगर बाजूला सारून राजेंद्र, मनोज यांच्यासह लेकीला शिकवले. मुलीचे लग्न करून कर्तव्य निभावले. मोठा मुलगा राजेंद्र मोलमजुरी करतो. त्याला मनोजही मदत करायचा. मजुरी करतानाच शिक्षणही घ्यायचा. भूमिहीन असलेल्या या कुटुंबाची परिस्थिती एवढी बिकट की, काम केल्याशिवाय चूलही पेटायची नाही.
आईने ग्रामपंचायतीत सफाई कर्मचारी म्हणून उभी हयात घालवली. गावातील केरकचरा गोळा करण्याचे काम करून संसार सावरला. मनोजने बीएपर्यंत शिक्षण घेतले, पण आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने पुढील शिक्षण घेऊ शकला नाही. कधी बांधकामावर बिगारी काम, तर कधी गॅस एजन्सीवर सिलिंडर वाहण्याचे अवजड काम करीन त्याने घरी हातभार लावला. दरम्यान, पोलिस झाल्याचे कळाल्यावर आई, भाऊ व विवाहित बहीण या सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. लेकाने पांग फेडले असे म्हणत, आईने त्याला कुरवाळत कुशीत घेतले. हा कौतुकाचा क्षण पाहून नातेवाईक, मित्रपरिवारही भावुक झाला.
दोन गुणांनी हुकली होती संधी
मनोज धुर्वे हा एकदा नाही दोनदा नाही तर मागील आठ वर्षांत पाचवेळा पोलिस भरतीसाठी मैदानात उतरला, पण नशीब हुलकावणी देत होते. वर्षभरापूर्वी तर अवघ्या दोन गुणांनी त्याची संधी हुकली. त्यानंतर तो पुन्हा जोमाने तयारीला लागला. अभ्यासिका संचालक जुगल बोम्मनवार यांनी त्यास मोफत मार्गदर्शन करून तयारी करून घेतली. अखेर यावर्षीच्या पोलिस भरतीत मनोज धुर्वेचे स्टार चमकले आणि त्याचे नाव अंतिम निवड यादीत झळकले.
पोलिस बनण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते, त्यासाठी कसोशीचे प्रयत्न करत होतो, पण यश येत नव्हते. मात्र, खचून गेलो नाही. पुन्हा तयारीला लागलो. आई- भावाने आयुष्यभर कष्ट केले, त्यांच्या पाठबळामुळे व मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांमुळेच पोलिस दलात भरती होऊन देशसेवेची संधी मिळू शकली.
- मनोज धुर्वे, पोलिस अंमलदार, गडचिरोली.