लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरी तालुका मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या मरपल्ली या छोट्याशा गावातील रमेश सन्यासी पेरगू या युवकाने एमपीएसीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. एवढेच नाही तर तो अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात दुसरा आला आहे.त्याच्या या यशाबाबत गडचिरोली येथील आकार अॅकॅडमी येथे खा. अशोक नेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगर परिषदेचे बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार, प्रा. अनिल धामोडे, अॅड. नीलकंठ भांडेकर, जि. प. सदस्य लता पुंघाटी, संतोष बोलुवार आदी उपस्थित होते.रमेशचे प्राथमिक शिक्षण मरपल्लीतील प्राथमिक शाळेत झाले. सिरोंचा येथील राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालयातून १२ वी उत्तीर्ण केल्यानंतर गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठातून घेतले. रमेश हा अर्थशास्त्र विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. तो नेटसेटसुद्धा उत्तीर्ण आहे. २०१४ मध्ये त्याने पहिल्यांदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. या परीक्षेत त्याला यश मिळाले नाही. मात्र खचून न जाता २०१७ मध्ये पुन्हा परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल ६ जानेवारी रोजी जाहीर झाला. रमेश हा राज्यातून एससी प्रवर्गातून दुसरा आला आहे. शासनाच्या सांख्यिकी अधिकारी, संशोधन अधिकारी अथवा नियोजन अधिकारी या तीन पदांपैकी एका पदावर त्याची वर्णी लागणार आहे. रमेशचे वडील शेतकरी असून रमेशला दोन भाऊ व तीन बहिणी आहेत. मुलांच्या वसतिगृहात राहून त्याने परीक्षेची तयारी केली. त्याचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
मरपल्लीचा युवक बनणार अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:15 PM
नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरी तालुका मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या मरपल्ली या छोट्याशा गावातील रमेश सन्यासी पेरगू या युवकाने एमपीएसीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. एवढेच नाही तर तो अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात दुसरा आला आहे.
ठळक मुद्देएमपीएससीची परीक्षा केली उत्तीर्ण : अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात दुसरा