पालिका प्रशासनाचा पुढाकार : विसर्जनातील निर्माल्य कचराकुंडीत टाकण्याचे आवाहनगडचिरोली : बहुतांश टाकाऊ वस्तूंपासून सेंद्रीय खत निर्मिती शक्य आहे. तसा प्रयोग राज्याच्या काही भागात सुरू आहे. मात्र यंदा प्रथमच गडचिरोली नगर पालिका प्रशासनाने या संदर्भात पुढाकार घेतला आहे. गणेश विसर्जनातील निर्माल्य न.प. कामगारांमार्फत एकत्र करून त्याच्यापासून सेंद्रीय खत निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याने निर्माल्यापासून सेंद्रीय खत निर्मिती होणार आहे. रविवारपासून गडचिरोली शहरात गणेश विसर्जनाची धूम सुरू झाली आहे. शहरातील बहुतांश सार्वजनिक मंडळाच्या गणरायाचे विसर्जन गोकुलनगर लगतच्या तलावात करण्यात येते. मात्र सार्वजनिक मंडळाचे काही कार्यकर्ते व लोक विसर्जनानंतर कुठेही अस्ताव्यस्त हार, फुले, नारळ आदी निर्माल्य टाकतात. त्यामुळे अस्वच्छता पसरते. पालिकेच्या वतीने येथे पूर्वी घंटागाडीची व्यवस्था करण्यात येत नव्हती. मात्र राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियानचा नारा दिल्यापासून गडचिरोली शहरात पालिकेच्या वतीने स्वच्छतेची काही प्रमाणात काळजी घेतली जात आहे. निर्माल्य व पुजेचे साहित्य अस्ताव्यस्त कुठेही न फेकता ते निर्माल्य तलावाच्या पाळीवर ठेवण्यात आलेल्या घंटागाडीतच टाकावे, अशा सूचनेचे फलक तलावाच्या पाळीवर लावण्यात आले आहे. येथील निर्माल्य रोजच्या रोज घंटागाडीद्वारे खरपुंडी नाक्याजवळील पालिकेच्या मोकळ्या जागेत टाकले जात आहे. गणपती नंतर शारदा, दुर्गा उत्सव आटोपल्यावर हार, फुले, नारळ व इतर साहित्य स्वतंत्र करण्यात येणार आहे. येथे खत निर्मितीची प्रक्रिया करण्यात येईल, अशी खात्रीशीर माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जनातील निर्माल्य इतरत्र अस्ताव्यस्त टाकू नये, असे आवाहन नगर पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने व नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांनी केले आहे. गेल्या सात-आठ दिवसांपासून तलाव परिसरात पालिकेचे तीन ते चार कामगार हजर राहून तलावाच्या पायऱ्यांवर फेकलेले निर्माल्य उचलण्याचे कामही करीत आहेत. याशिवाय न.प.चे कामगार दररोज या ठिकाणी येऊन पायऱ्यावरील केरकचरा तसेच निर्माल्य उचलून स्वच्छता करीत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)प्राणहानी टाळण्यासाठी स्पीडबोटची व्यवस्थागोकुलनगर लगतच्या तलावाच्या पात्रात प्रचंड पाणीसाठा आहे. पाळीच्या खाली पायऱ्या लगतही १५ फूट पाणी आहे. या परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून खांब उभारून कठडे तयार करण्यात आले आहे. मात्र उत्साहाच्या भरात सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते तसेच भाविक कठड्याच्या पलिकडे जाऊन मूर्तीचे विसर्जन करण्याचा प्रयत्न करू शकतात. सदर तलावपात्रात प्राणहानी होऊ नये, यासाठी पोलीस विभागातर्फे येथे मंगळवारी मोठ्या स्वरूपाची स्पीड बोट उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर स्पीड बोट पोलीस मुख्यालयातून गडचिरोली शहर पोलिसांनी येथे आणली आहे. याशिवाय मंगळवारपासून तलावाच्या पाळीवर ५० वर पोलीस व गृहरक्षक तैनात करण्यात आले आहेत.
निर्माल्यापासून खत निर्मिती होणार
By admin | Published: September 14, 2016 1:40 AM