गडचिराेली : जिल्ह्यात शाळाबाह्य बालकांची शाेधमाेहीम १ ते १० मार्च या कालावधीत शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आली. या माेहिमेत तब्बल ३२७ शाळाबाह्य बालके आढळून आली. त्यांना आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जात आहे.
शाळाबाह्य बालकांची शाेधमाेहीम व्यापक स्वरूपात राबविण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आले हाेते. शासन निर्णयानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच जिल्हास्तरीय समितीची बैठक घेऊन शाळाबाह्य बालकांचा शाेध घेण्याबाबत निर्देश दिले. त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षणाधिकारी आर. पी. निकम यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात शाळाबाह्य बालकांची शाेधमाेहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. एकही मूल शाळाबाह्य राहू नये, यासाठी यंत्रणेतील प्रत्येक घटकावर जबाबदारी निश्चित करण्यात आली हाेती. तसेच प्रत्यक्ष सर्वेक्षण करताना वाडी, वस्त्या, विटाभट्टी, झाेपडपट्टी, गर्दीच्या वस्ती, बसस्थानक, ग्रामीण भागातील, बाजार, माेठी बांधकामे, स्थलांतरीत बांधकामे, झाेपड्या, फुटपाथ तसेच विविध वस्तू विकणारी तसेच रस्त्यावर भीक मागणारी बालके, लाेककलावंतांची वस्ती, अस्थायी निवारा करणारी कुटुंबे, भटक्या जमाती, बालमजूर आदी गटातील व त्यांची माहिती या शाेधमाेहिमेत घेण्यात आले. १० मार्चपर्यंत या माेहिमेत एकूण ३२७ शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आले.
१० दिवस राबविण्यात आलेल्या या शाेधमाेहिमेत शाळेत कधीच न गेलेली २६ मुले व ४३ मुली अशा एकूण ६९ बालकांचा समावेश हाेता. अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झालेल्या बालकांची एकूण संख्या २५८ आहे.
बाॅक्स ......
तालुकानिहाय शाळाबाह्य मुलांची आकडेवारी
तालुका बालके
गडचिराेली ३
आरमाेरी ९
देसाईगंज ५
कुरखेडा २४
काेरची ३
धानाेरा ५३
चामाेर्शी ६
मुलचेरा १
अहेरी ५३
एटापल्ली ४
भामरागड ९१
सिराेंचा ७५
एकूण ३२७
बाॅक्स .....
५५ इतर कारणांमुळे शाळाबाह्य विद्यार्थी
११ विशेष गरजाधिष्टीत बालके
बाॅक्स .......
मुलींची टक्केवारी अधिक
जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात शाळाबाह्य बालकांची शाेधमाेहीम राबविण्यात आली असून दहा दिवस चाललेल्या या माेहिमेत १५६ मुले व १७१ मुली आढळून आल्या. शाेधून काढलेल्या बालकांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे. मुलांपेक्षा मुलींची टक्केवारी जास्त आहे. ५५ टक्क्यांपेक्षा अधिक शाळाबाह्य मुली आढळून आल्या आहेत.
बाॅक्स ......
४,३०० शिक्षक कर्मचारी व मुख्याध्यापक सहभागी
शाळाबाह्य विद्यार्थी शाेधमाेहीम राबविण्यासाठी जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने नियाेजन करण्यात आले. बाराही तालुका स्तरावर गटसाधन केंद्राच्या माध्यमातून ही माेहिम राबविण्यात आली. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी मिळून जवळपास ४ हजार ३०० जण या माेहिमेत सहभागी झाले हाेते.
काेट .....
शासनाच्या आदेशान्वये व शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात व सर्व गावांमध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. या माेहिमेत एकूण ३२७ शाळाबाह्य बालके आढळून आली. या सर्व बालकांना त्या-त्या स्तरावर तालुक्यातील गावांमध्ये शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जात आहे. - आर. पी. निकम, शिक्षणाधिकारी, प्राथमिक तथा माध्यमिक, गडचिराेली
बाॅक्स ......
भामरागड तालुक्यात सर्वाधिक बालके
अतिदुर्गम व नक्षल प्रभावित समजल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यात सर्वाधिक शाळाबाह्य बालके आढळून आली असून, ती संख्या ९१ आहे. यामध्ये मुली ४९ व ४२ मुलांचा समावेश आहे. येथे राेजंदारीसाठी येणाऱ्या मजूर व स्थलांतरित नागरिकांची संख्या अधिक असल्याने सर्वाधिक बालके या तालुक्यात आढळून आली.