जीर्ण शाळा कायमच
चामोर्शी : तालुक्यासह जिल्हाभरात जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या अनेक जुन्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. पावसामुळे जीर्ण इमारती कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही. सतत मागणी करूनही जीर्ण इमारती निर्लेखित केल्या नाहीत.
घरपट्टे मिळण्यास विलंब
गडचिरोली : शहरात गोकुलनगर, रामनगर, इंदिरानगर, विवेकानंदनगर, विसापूर हेटी या परिसरात अतिक्रमण करून हजारो कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र अद्यापही जागेचे पट्टे देण्यात आले नाहीत. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर बांधकामासाठी स्वत:च्या मालकीची जागा पाहिजे.
कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात. येथे अस्वच्छता पसरली आहे.
कन्नमवार नगरात डासांचा प्रादुर्भाव
गडचिरोली : कन्नमवार नगरातील अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नागरिकांना विविध आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे नियमित डास प्रतिबंधक फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अंकिसा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
अंकिसा : येथील मुख्य मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून आसरअल्लीदरम्यानच्या गावातील नागरिक ये-जा करीत असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.
अनियमित वीज पुरवठ्याची समस्या
कोरची : तालुक्याचा बहुतांश भाग अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आहे. घनदाट जंगलाने तालुका व्यापला असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यास पूर्ववत सुरू करण्यास बराच वेळ लागतो. दुर्गम भागात महावितरण कंपनीने नियमित वीज पुरवठा करावा, अशी मागणी हाेत आहे. कोरची तालुका मुख्यालयापासून कोटगूल क्षेत्र छत्तीसगड सीमेला लागून जवळपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे.