लाेकमत न्यूज नेटवर्क
सिराेंचा: सततच्या पुरामुळे गाेदावरी व प्राणहिता नद्यांचे पात्र खचून अनेक शेतकऱ्यांची शेकडाे हेक्टर जमीन नदीत विलिन झाल्याने या शेतकऱ्यांवर भूमिहीन हाेण्याची पाळी आली आहे. सिराेंचा तालुक्याला प्राणहिता व गाेदावरी या दाेन नद्यांचा वेढा आहे. अनेक गावे नदीजवळ वसली आहेत. काही शेतकऱ्यांची शेतजमीन अगदी नदीच्या काठावर आहे. पावसाळ्यात येत असलेल्या पुरांमुळे नदीचे पात्र खचत चालले आहे. त्यामुळे नदीकाठाजवळची जमीन नदीत लुप्त हाेत चालली आहे. यावर्षी जवळपास ४०० हेक्टर जमीन नदीत लुप्त झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नदीकाठची जमीन सुपीक असल्याने शेतकरी या शेतजमिनीवर प्रामुख्याने मका, ज्वारी, मूग, मिरची आदी पिकांची लागवड करीत हाेते. नदीच्या पाण्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध हाेत हाेती. मात्र या जमिनीवर आता रेती पडली आहे. त्यामुळे त्यात काेणतेच उत्पादन घेणे शक्य नाही. शेतीतून निघणारे उत्पादन बंद झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडत चालली आहे. महसूल विभागाने या जमिनीचा सर्वे करून ज्या शेतकऱ्यांची जमीन नदीत गेली आहे. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.