नोंदणीसाठी मागितले पैसे: बीएसएनएलमध्ये नोकरी व साडेनऊपट रक्कम देण्याचे आमिषआनंद मांडवे सिरोंचाटॉवर उभारणीसाठी ९० चौ.फूट स्वमालकीची जमीन अधिग्रहण करून दिल्यास कुटुंबातील एका सदस्यास बीएसएनएलमध्ये नोकरी, दोन भूखंड दिल्यास दोघांना नोकरी, शिवाय कमीतकमी ५० हजार रूपयांची नगदी सिक्युरिटी रक्कम भरणा केल्यास ३ महिन्यांतच साडेनऊपटीने परत देऊ, असे आमिषाचे गाजर दाखवून अहेरी उपविभागाच्या पाचही तालुक्यातील शेकडो नागरिकांना गंडा घातल्याची विश्वसनीय माहिती ‘लोकमत’च्या हाती आली आहे. मात्र जागा अधिग्रहण व डिपॉझिटचा व्यवहार पार पडण्यापूर्वी उच्च न्यायालयात नोंदणी व करारनामा प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यासाठी एका टॉवरचे ७ हजार प्रमाणे अतिरिक्त फी देणे आवश्यक आहे, असेही सांगण्यात आले. सचिन रंगनाथ भोसले असे ठगाचे नाव असून तो उस्मानाबादहून १० किमी अंतरावरील जुनोनी गावचा रहिवासी असल्याचे वृत्त आहे.गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे किरायाने राहुन त्याने या घपलेबाजीचे सुत्रसंचालन केले. याकामी परिचित व एजंटची भूमिका बजावणारे त्याचे मदतनीस अडचणीत आले आहेत. एका वर्षाचा कालावधी उलटूनही भोसलेने आश्वासनपूर्ती न केल्याने त्या सर्वांचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. तीन महिन्यात नोकरीसह नऊपट रक्कम देण्याचा वादा करणाऱ्या भोसले या ठगाशी एजंटनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, असता त्याचा मोबाईल नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्यवहाराअंतर्गत रक्कम वसुलीच्या नोंदी (बंदुकपल्ली) आलापल्ली येथील संतोष रूपचंद कविराजवार यांच्या हस्ताक्षरातील आहेत. सदर इसम भोसलेचा एजंट म्हणून काम करीत होता. इतर साथीदारांमध्ये नागुलवाही येथील सुधाकर विठ्ठल कुमरे, कथीत कंपनीच्या नावे येनापूर येथे काम करणारा राकेश बंडावार, चामोर्शी येथील संपर्कसूत्र बाबाजी व येनापूरचा बकाले आदींचा समावेश आहे. या बकालेंनी स्वत:ची जमीन टॉवरसाठी दिल्याची माहिती असून सचिन भोसलेच्या पीडितांमध्ये मल्लय्या बक्कय्या कांबळे या आलापल्लीच्या इसमाचाही समावेश आहे. चार वर्षांचा कालावधी उलटूनही सदर ठगसेनेविरूद्ध अद्यापर्यंत पोलिसात तक्रार झालेली नाही. त्यामुळे चोरीचा मामला अद्यापही गुलदस्त्यात आहे. पोलिसांमध्ये तक्रार केल्यास आपले पैसे परत मिळणार नाही, या भीतीपोटी अनेकांनी तक्रार केली नाही. शांततेत प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणात २० पेक्षा अधिक नागरिकांची लाखो रूपयांनी फसवणूक झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पोलिसांच्या मार्फतीने तपास होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मात्र ज्यांची फसवणूक झाली, तेच शांत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अहेरी उपविभागातील या व्यक्तींची झाली फसवणूकभोसलेने गंडा घातलेल्या नागरिकांमध्ये रेगुंठा येथील व्यंकटी अंकलू झोडे यांचा समावेश आहे. झोडे यांनी ५ जानेवारी २०१५ रोजी दोन टॉवरसाठी ५० हजार व नोंदणी खर्च म्हणून ९ हजार रूपये दिले आहेत. सखाराम अंकलू झोडे यांनी दोन टॉवरसाठी नोंदणी खर्च १४ हजार रूपये दिल्याची नोंद आहे. दर्रेवाडा येथील महेश राजाराम कावरे, राजाराम येल्ला कावरे यांनी प्रत्येकी १ लाख रूपये दिले. पेंटीपाका चक येथील मंगला इस्तारी कुमरी १ लाख, रंगधाम पेठा येथील मधुकर लसमय्या गोलकोंडा, संतोष रामय्या कडार्ला यांनी १४ हजार रूपये नोंदणी खर्च दिला आहे. आसरअल्ली येथील क्रिष्णस्वामी रामरेड्डी सोमनपल्लीवार यांनी पत्नी जयलक्ष्मीच्या नावे ३१ आॅक्टोबर २०१४ रोजी नोंदणी खर्चापोटी १४ हजार रूपये दिले. याशिवाय टेकडाताला येथील मधुकर निलम ७० हजार रूपये, मुलचेरा येथील दुलाल कालिपद साना, काकोली दुलाल साना, एटापल्लीचे सुरेश व्यंकटी दासरवार, लाहेरीचे रमेश बाबुराव घोसरे, पुरसलगोंदीचे मासू डेबला पुंगाटी, अहेरीच्या सुश्रुषा बाबुराव मडावी, आलापल्लीच्या सखुबाई गोमाजी तुमडे यांच्याही रकमा गुंतल्या आहेत. यातील सुश्रुषा मडावी, मासू पुंगाटी यांच्या प्रत्येकी ५० हजार रूपयांची गुंतवणूक असून इतरांनी प्रत्येकी एक लाख रूपये गुंतविले आहेत. घराचे बांधकाम थांबवून रकमेचा भरणामल्लय्या काबळे यांनी स्वत:च्या घराचे बांधकाम स्थगीत करून छल्लेवाडा येथील दोन व तलवाडा येथील दोन अशा चार टॉवरसाठी प्रत्येकी ५० हजार रूपये प्रमाणे दोन लाख रूपये दिले आहेत. यापेक्षा उत्तम घर तीन महिन्यांनी बांधू या आशेने त्यांनी हा व्यवहार केला. पत्नी हनाबाईसह दोन मुली मीना व विद्या यांच्या नावे नोंदणी खर्च म्हणून प्रत्येकी ७ हजार रूपये प्रमाणे एकूण २८ हजार रूपये वेगळे भरले आहेत. त्यांनी स्वत:च्या नावाने १९ नोव्हेंबर २०१४ रोजी २० हजार, ३० नोव्हेंबर रोजी ४० हजार व १४ डिसेंबर २०१४ रोजी आणखी ४० हजार रूपयांचा भरणा केला आहे. या व्यवहारात कांबळे यांचे एकूण २ लाख २८ हजार रूपये फसले आहेत. कांबळे यांनीसुद्धा याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये अजूनपर्यंत केली नाही. एजंटच्या मार्फतीने मात्र पैसे परत मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे.
नोकरीच्या नावावर अनेकांना गंडविले
By admin | Published: May 27, 2016 1:20 AM