गडचिरोली : गडचिरोली शहराजवळची शेकडो एकर जागा एमआयडीसीसाठी राखीव करण्यात आली आहे. या परिसरात पाणी, वीज यासारख्या सुविधाही राज्य शासनाच्या वतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र बहुतांश भूखंड रिकामेच आहेत. काही भूखंडांवर उद्योग स्थापन केले नाही. याचा परिणाम रोजगारावर होत आहे.
सीमावर्ती गावांत समस्यांची भरमार
गडचिरोली : छत्तीसगड, आंध्रप्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या चार तालुक्यातील औद्योगिक विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात जिल्ह्यात एकही मोठे उद्योग निर्माण न झाल्याने बेरोजगारी वाढली आहे. या भागात वीज, पाणी, आरोग्य यासह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.
आलापल्लीतील थ्री-जी सेवा नावापुरतीच
आलापल्ली : आलापल्ली येथे बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलचा इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिला जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून सेवा मात्र टू-जी प्रमाणे दिली जात आहे.
अनेक ठिकाणचे दिशादर्शक फलक बेपत्ता
एटापल्ली : अहेरी उपविभागातील मार्गावर लावण्यात आलेले अनेक ठिकाणचे दिशादर्शक फलक बेपत्ता झाले आहे. यामुळे रात्री अनोळखी नागरिक तसेच वाहनचालक रस्ता विसरून भलतीकडेच वळतात. संबंधित यंत्रणेने अशा ठिकाणी दिशादर्शक फलक लावावे, अशी मागणी आहे.
ऑनलाईन सुविधेपासून ग्रामपंचायती वंचित
गडचिरोली : ग्रामपंचायत स्तरावरील संपूर्ण दस्तावेज ऑनलाईन करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपये खर्च होत आहेत. मात्र अजूनही बऱ्याचशा ग्रामपंचायती ऑनलाईन झाल्या नाहीत. त्यामुळे आधुनिक सुविधांपासून वंचित आहेत.
तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंड बस्त्यात
गडचिरोली : गोकुलनगर लगतच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले होते. मात्र सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही. तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंड बस्त्यात असल्याचे दिसून येत आहे.
पंचायत समित्यांमध्ये डिझेल इंजिन धूळखात
गडचिरोली : डिझेलचा भाव वाढल्याने शेतकरी वर्ग विद्युत पंप घेण्याकडे वळला आहे. मात्र जिल्हा परिषद अजूनही डिझेल इंजिनचा पुरवठा करीत आहे. शेतकरी ५० टक्के अनुदानावर डिझेल इंजिन खरेदी करण्यास तयार होत नाही. त्यामुळे या इंजिन धूळखात पडल्या आहेत.
कमलापुरात मूलभूत समस्याच भारी
कमलापूर : अहेरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथे सोयीसुविधांची भरमार असणे जनतेला अपेक्षित होते. परंतु कित्येक वर्षांपासून गावातील नागरिकांना मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
जिल्हा परिषदेसमोर अतिक्रमण सुरूच
गडचिरोली : जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूला काही दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. मात्र या दुकानदारांवर कोणतीही कारवाई बांधकाम विभाग तसेच नगर परिषद प्रशासन करीत नसल्याने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा पकडून दुकाने थाटली जात आहेत. विशेष म्हणजे दुकानाच्या समोर वस्तू ठेवल्या जात आहे.
जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करा
चामोर्शी : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेली वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्रांअभावी पोलीस ठाण्यामध्येच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत. वाहने लिलाव केल्यास गरजू व्यक्तींना याचा लाभ होईल. त्यामुळे वाहनांचा लिलाव करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
गतिरोधक दर्शक फलक लावा
गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने काही दिवसांपासून चंद्रपूर मार्गावर आयटीआय चौकात गतिरोधक उभारले. मात्र रात्रीच्या वेळेस सदर गतिरोधक वाहनधारकांना दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासनाने येथे गतिरोधक दर्शक फलक लावावा.
बाजारात ओट्यांची निर्मिती करा
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी हे परिसरातील मोठे गाव असून येथे दर शुक्रवारला आठवडी बाजार भरतो. परिसरातील शेकडो नागरिक वस्तूच्या खरेदी-विक्रीसाठी बाजारात येतात. मात्र या बाजारात ओट्याची व्यवस्था नसल्याने विक्रेत्यांसह ग्राहकांना त्रास होत आहे. त्यामुळे ओटे बांधावेत.
चातगाव बसथांब्यावर स्वच्छतागृह उभारा
धानोरा : चातगाव येथील बसथांब्यावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने त्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चातगाव बसथांब्यावर स्वच्छतागृहाची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे. मात्र याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
कमाल जमीन धारणेची अट रद्द करा
अहेरी : रोहयोंतर्गत कृषी व सिंचन योजनांचा लाभ घेण्यासाठी ओबीसी लाभार्थ्यांना पाच एकरची कमाल जमीन धारणेची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. ही अट हटविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांकडे पाच एकरपेक्षा अधिक जमीन आहे. मात्र सदर जमीन सिंचनाअभावी पडीक आहे.
पशु विभागातील रिक्त पदे भरा
एटापल्ली : पशुवैद्यकीय विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे जनावरांवर वेळीच उपचार होण्यास अडथळे निर्माण होत आहे. अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यात कर्मचारी उपलब्ध नसल्याने शिपाईच कारभार सांभाळत आहेत. पशुसेवा अस्थिपंजर झाल्याने गेल्या दोन वर्षात अनेक पाळीव जनावरे आजाराने दगावली आहेत.
वेलतूर मार्गावर काटेरी झुडपे कायमच
चामोर्शी : तालुक्यातील एकोडी- वेलतूर तुकूम मार्गावरील दुतर्फा काटेरी झुडपांची वाढ मोठ्या प्रमाणावर झाल्याने या झाडांमुळे वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे सदर झुडपे त्वरित तोडावीत, अशी मागणी होत आहे.
कृषिपंप अजूनही विजेच्या प्रतीक्षेत
देसाईगंज : शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पंप देण्यात आले. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही वीज जोडणी मिळाली नाही.
रायगट्टा पुलावर कठडे उभारण्याची मागणी
अहेरी : तालुक्यातील रायगट्टा पुलावर कठडे उभारण्यात आले नाही. सदर पूल कमी उंचीचा व अरूंद आहे. कठडे नसल्याने वाहन पुलाच्या खाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. कठडे नसल्याने जनावरेसुद्धा जखमी झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी कठडे उभारावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा
देसाईगंज : दिवसेंदिवस देसाईगंज शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. स्थानिक नागरिकांनी या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी अनेकवेळा नगर परिषदेकडे केली आहे. मात्र याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे.
खरपुंडी मार्गाचे रूंदीकरण केव्हा?
गडचिरोली : खरपुंडी मार्गाचे रूंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रूंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरून जेप्रा, दिभना, अमिर्झा, चांभार्डा, आंबेशिवणी, भिकारमौशी, राजगाटा, उसेगाव आदी गावातील शेकडो नागरिक ये-जा करतात.
मोडकळीस आलेल्या शाळांची दुरूस्ती करा
सिरोंचा : दुर्गम भागातील अनेक शाळांच्या इमारतींना ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत पोहोचल्या आहेत. या इमारतींचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधण्याची मागणी होत आहे.
मध संकलनाचे प्रशिक्षण द्या
धानोरा : जिल्ह्यात मध संकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मध संकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील अनेक गावातील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही.
कव्हरेज नसल्याने नागरिक त्रस्त
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावांचा संपर्क आहे.
रस्त्याच्या बाजूची झाडे धोकादायक
गडचिरोली : जिल्ह्यातील मुख्य रस्त्याच्या बाजुला झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाही. यामुळे अनेकवेळा अपघात घडले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे झुडपे तोडण्याची गरज आहे. गडचिराेली-आरमाेरी या मार्गावर अनेक ठिकाणी झाडे झुडपे वाढले आहेत. सायंकाळच्या सुमारास दुचाकीस्वारांना झुडपे दिसत नाही.
अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन रखडले
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशुंमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशुंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत असतानाही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.