गेल्या १५ दिवसांत पाऊस बऱ्यापैकी झाल्याने खरीप हंगामातील धान पेरणीचे काम आणि शेतातील पाळ्यांवर माती टाकण्याचे काम सुरू आहे. शेतकरीवर्ग आपल्या कुटुंबासह शेतातील कामे करण्यासाठी सकाळीच जात आहेत. घरच्या शेतीकामात मदत करण्यासाठी अनेक विद्यार्थीही सरसावले आहेत. ज्या वयात हातात पेन हवा, त्या वयात हातात फावडे घेऊन शेतातील अंगमेहनतीची कामे करण्याची दुर्दैवी वेळ या शाळकरी मुलांवर आली आहे.
खरीप हंगामात पेरणी व माती कामे एकाच वेळी शेतकरी करीत असल्याने शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण जात आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह शेतात राबताना दिसून येत आहेत. इतर कोणत्याही कामाला महत्त्व न देता सर्वजण शेतात राबत आहेत. काही पालक आपल्या पाल्यांना शेती काम करू न देता शिक्षणाकडे लक्ष देण्याचा सल्ला देतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे विद्यार्थी शेतात रममाण होताना दिसत आहेत.
(बॉक्स)
२८पासून नवीन सत्र, प्रत्यक्ष वर्ग नाहीच
यावर्षी तरी शाळा सुरू होऊन शाळेत जाऊ, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. मात्र, कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत देण्यात आल्याने यावर्षीही शाळेचे वर्ग प्रत्यक्ष भरणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था कायम आहे. यावर्षीचे शैक्षणिक सत्र २८ जूनपासून सुरू होणार आहे. साधारण जून महिन्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू होते. पण, शाळा सुरू होण्याच्या हालचाली नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी घरी रिकामे बसण्यापेक्षा वडिलांना शेतीकामात मदत करण्यात गुंतले आहेत.
===Photopath===
220621\img-20210622-wa0126.jpg
===Caption===
शाळकरी मुली राबताहेत शेतीच्या कामावर फोटो