गडचिरोली - जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व भागातील शेवटचा तालुका असलेल्या भामरागडनजीक वाहणाऱ्या पर्लकोटा नदीचे विस्तीर्ण पात्र शनिवारी पूर्णपणे भरले. सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान नदीचे पाणी पुलावरून वाहने सुरू झाल्याने वाहतूक पूर्णपणे बंद होऊन अनेक गावांचा दळणवळण संपर्क तुटला आहे.गेल्या आठवडाभरात नियमित हजेरी लावलेल्या पावसाचा जोर दोन दिवसात वाढला आहे. त्यातच छत्तीसगडकडेही जास्त पाऊस झाल्याने पार्लकोटा नदीचे पात्र फुगले. यावर्षी या नदीच्या पुलावरून पाणी वाहण्याची ही पहिलीच वेळ आहे.पुलावरील पाण्यातून पैलतीर गाठण्याचा प्रयत्न कोणी करू नये म्हणून महसूल आणि नगर पंचायत प्रशासनाने दोन्ही तीरावर कर्मचाऱ्यांना तैनात केले. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही तयार आहे. पुराचे पाणी नदीलगतच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरल्यास खबरदारीचा उपाय म्हणून लोकांनी सुरक्षित स्थळी सामान हलविणे सुरू केले आहे.पूर परिस्थितीत वीज पुरवठा आणि मोबाईल संपर्क सुरू राहावा यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. तहसीलदार सत्यनारायण सिलमवार, नायब तहसीलदार प्रकाश उप्पुलवार, अनमोल कांबळे, नगर पंचायत मुख्याधिकारी सुरज यादव परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.
भामरागडमधील पर्लकोटा नदीच्या पुलावर पुराचे पाणी, वाहतूक बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 9:17 PM