गडचिरोली : माओवादी संघटनेने सरकारविरोधात नवी रणनीती आखली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्यासह दीर्घकालीन लोकयुद्ध पुकारण्याचे आवाहन केले आहे. माओवादी संघटनेच्या १९व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय समितीने २८ पानांचे पत्रक काढले, यात भाजपला इशारा देण्यात आला आहे.
माओवादी संघटनेचा १९ वा वर्धापन दिन सप्टेंबरमध्ये आहे. यानिमित्ताने २१ ते २७ सप्टेंबर २०२३ दरम्यान क्रांतिकारी उत्साहात हा सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केंद्रीय समितीने केले आहे. मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, ओडिशा, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या राज्यांतील विधानसभा तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत ब्राह्मणीय हिंदुत्वाविरुद्ध व्यापक लढा देण्याचे आवाहन माओवादी संघटनेने केले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन देखील पत्रकात केले आहे. देशातील खोट्या संसदीय जनवादाला नवजनवादाच्या माध्यमातून उत्तर देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी दीर्घकालीन लोकयुद्धासाठी जनतेला राजकीयदृष्ट्या तयार रहावे लागेल, असे पत्रकात नमूद आहे.
१२ कलमी कार्यक्रम
माओवादी संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त १२ कलमी कार्यक्रम निश्चित केला आहे. यात दंडकारण्याचा विकास, जनाधार आणि माओवादी संघटनेची बांधणी, वर्ग संघर्ष, दीर्घकालीन युद्धाला व्यापक करणे, साम्राज्यवादी, नोकरशाही व भांडवलशाहांविरोध तीव्र लढा देणे अशी रणनीती आखली आहे.
वर्षभरात १२१ नक्षली नेत्यांचा मृत्यू
माओवादी चळवळीने गतवर्षी १२१ नेते गमावल्याचा या पत्रकात उल्लेख आहे. यात ९० कॉम्रेड, ३१ महिला कॉम्रेड यांचा समावेश आहे. केंद्रीय कमिटी सदस्य कटकम सुदर्शन उर्फ आनंद, राज्य कमिटी सदस्य एल.एस.एन. मूर्ती, बिहार, झारखड स्पेशल एरिया कमिटी सदस्य गौतम पाशवान या आघाडीच्या नेत्यांचा यात समावेश आहे. या सर्वांचे स्मरण करून ही चळवळ अधिक पुढे नेण्याचे आवाहन केले आहे.