लाखो भाविकांनी घेतले दर्शन : अतुल गण्यारपवार यांनी सपत्नीक केली शिवलिंगाची पूजाचामोर्शी : बीज दर्शनाच्या दिवशी बुधवारी मार्र्कंडादेव येथे श्री मार्र्कंडेश्वराची पालखी काढण्यात आली. यावेळी यात्रेकरिता आलेल्या लाखो शिवभक्तांनी मार्र्कंडेश्वराच्या पालखीचे दर्शन घेतले. सर्वप्रथम जिल्हा परिषदेचे वित्त, नियोजन व बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, त्यांची पत्नी साधना गण्यारपवार यांनी मार्र्कंडेश्वराच्या मुख्य मंदिरात शिवलिंगाची आरती व पूजा केली. त्यानंतर दुपारी ३ वाजता मार्र्कंडेश्वराच्या पालखीला सुरुवात करण्यात आली. सदर पालखी यात्रेमध्ये फिरविण्यात आली. ढोल, तासे, सनईच्या व मतुआ महासंघ गौरीपूरच्या भजनाच्या गजरात मार्र्कंडेश्वराची पालखी काढण्यात आली. यावेळी ‘हर...हर... महादेव’च्या घोषणेने संपूर्ण मार्र्कंडानगरी दुमदुमली होती. याप्रसंगी अतुल गण्यारपवार, साधना गण्यारपवार यांच्या सोबत बाल स्वामी महाराज पिपरे, रामू महाराज, मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, सचिव मृत्यूंजय गायकवाड, कोषाध्यक्ष पा. गो. पांडे, सहसचिव रामुजी तिवाडे, रामप्रसाद मराठा धर्मशाळेचे अध्यक्ष गंगाधर कोंडुकवार, सचिव केशव आंबटवार, मुनरत्तीवार, नानाजी बुरांडे, अशोक तिवारी, श्यामराव दुधबळे, उमाकांत जुनघरे, दिलीप चलाख, जयराम चलाख, ज्ञानेश्वर कुनघाडकर आदी उपस्थित होते. चामोर्शीलगतच्या गौरीपूर येथील मतुआ महासंघाचे भजन मंडळी या पालखीदरम्यान आकर्षण ठरले. पालखीदरम्यान यात्रा परिसरात चामोर्शीचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या नेतृत्वात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ७ मार्चपासून विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे यात्रेला प्रारंभ झाला आहे. चार दिवसात पाच लाखांवर भाविकांनी मार्र्कंडानगरीत हजेरी लावून मार्र्कंडेश्वराचे दर्शन घेतले. अनेकांनी वैनगंगा नदीपात्रात शाही स्नान केले. सायंकाळच्या सुमारास यात्रेतील मनोरंजन केंद्र असलेल्या ठिकाणी लोकांची प्रचंड गर्दी होत आहे. आबालवृद्धासह सारेच भाविक मार्र्कंडा येथे येऊन यात्रेतील सुविधांचा लाभ घेत आहेत. गडचिरोली आगाराच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी मार्र्कंडावरून गडचिरोलीकडे रात्री ९ वाजतानंतरही बसफेऱ्या सोडल्या जात आहेत. (शहर प्रतिनिधी)
मार्र्कं डेश्वराची निघाली पालखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2016 2:08 AM