चामोर्शी (गडचिरोली) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर यात्रेला प्रारंभ झाला. १९ फेब्रुवारीला अमावस्या असल्याने परंपरेनुसार सायंकाळी ६ वाजता मंदिराच्या कळसावर व नदीच्या तीरावर टिपूर (दिवे) लावण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाड बुजूरुक येथील मारोती म्हशाखेत्री यांचे चिरंजीव प्रशांत म्हशाखेत्री व राजू म्हशाखेत्री यांच्या हस्ते टिपूर लावण्यात आले. मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. मार्कंडेश्वराचे मंदिर वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर असून येथे वैनगंगा नदी उत्तर वाहिनी असल्यानेच हे स्थळ भाविकांच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे. त्यामुळे येथे महाशिवरात्रीला भरणाऱ्या यात्रेला भाविकांच्यादृष्टीने फार महत्त्व असते.
टिपूर लावताना अरुण गायकवाड, पंकज पांडे, रामू महाराज गायकवाड, उज्ज्वल गायकवाड, दिवाकर भवडकर, उमेश हेजिप यांच्याही हस्ते दिवे लावण्यात आले. दिवे लावण्याचा मान गेल्या अनेक पिढ्यांपासून म्हशाखेत्री कुटुंबाला मिळत आहे हे विशेष. दिव्यांचे महत्त्व असल्याने या दिवशी भाविक आवर्जून उपस्थित असतात. टिपूर लावताना देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्युंजय गायकवाड, माजी खासदार मारोतराव कोवासे, सहसचिव रामूजी तिवाडे, विश्वजित कोवासे, चंद्रकांत दोषी, साधना दोषी, उपेश हेपिज, नानाजी बुरांडे, दादाजी बारसागडे आदी उपस्थित होते. यावेळी पंढरपूर येथील जगन्नाथ महाराज भजन मंडळ उपस्थित होते.
महादेवगडावर उसळला भाविकांचा जनसागर
आरमोरी : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आरमोरी येथील महादेव गड डोंगरी येथे महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांचा जनसागर उसळला होता. हर हर महादेव.. बम बम भोलेच्या जयघोषाने डोंगरी येथील महादेव गड परिसर दुमदुमून गेला. दोन दिवस सकाळपासून ते सायंकाळपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या हाेत्या.
महाशिवरात्रीनिमित्त येथील महादेवगड डोंगरी येथे १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता माजी आ. हरिराम वरखडे व मोतीराम चापळे यांच्या हस्ते ब्रम्हपुरी येथील भैरव महाराज यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. तसेच दुपारी १ वाजता देवस्थान कमिटीच्या वतीने होम हवन करण्यात आले. या हवनामध्ये शहरातील अनेक दाम्पत्यांनी भाग घेतला होता.
महादेव गडावर यात्रा दोन दिवस असल्याने भाविकांची पहिल्या व दुसऱ्या दिवशी मोठी गर्दी दिसून आली. यात्रेकरुंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आरमोरी येथील युवा रंगच्या कार्यकर्त्यांनी पाणपोई सुरू केली. तसेच महादेव गडाच्या खाली भाविकांसाठी विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते. विविध दुकाने थाटलेली होती. पोलिसांनी चाेख पाेलिस बंदाेबस्त ठेवला हाेता.
जत्रेकरिता ट्रस्टतर्फे भाविकांच्या सोयी करिता विशेष सुविधा पुरविण्यात आल्या. १९ फेब्रुवारीला यात्रेच्या शेवटच्या दिवशी दुपारी १ वाजता गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेच्या आयोजनासाठी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष माजी आ. हरिराम वरखडे, उपाध्यक्ष केशव कुंभारे, सचिव वामन जुवारे, सहसचिव राकेश घाटे, कोषाध्यक्ष मोतीराम चापळे, संघटक चंद्रशेखर पप्पूलवार यांनी सहकार्य केले.
टिपूर जाळून वैरागड यात्रेचा समाराेप
वैरागड : महाशिवरात्रीचे औचित्य साधून १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत वैरागड येथे यात्रेचे आयाेजन करण्यात आले हाेते. १९ फेब्रुवारी राेजी भंडारेश्वर मंदिरात टिपूर जाळून यात्रेचा समाराेप करण्यात आला.
ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पाेरेड्डीवार व श्री किसनराव खाेब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खाेब्रागडे यांच्या हस्ते टिपूर जाळण्यात आला. यावेळी सरपंच संगीता पेंदाम, उपसरपंच भास्कर बाेडणे, भंडारेश्वर देवस्थान समितीचे पदाधिकारी बालाजी पाेपटी, महादेव दुमाने, केशव गेडाम, दत्तू साेमनकर, रत्नाकर धाईत, डाेनू कांबळे, संगिता मेश्राम, प्रतिभा भटकर, दीपाली ढेंगरे, शाखा व्यवस्थापक पद्माकर शेबे, विश्वनाथ ढेंगरे, विजय गुरनुले, लिलाधर उपरे, दिनकर लाेथे, पाेलिस निरीक्षक मनाेज काळबांडे, पाेलिस पाटील गाेरख भानारकर, बीट जमादार वसंत जवंजाळकर उपस्थित हाेते.