अहेरी : अहेरी येथील भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएम केंद्रात सध्या गुरांचा बाजार भरला असून या एटीएम केंद्राची सुरक्षा भगवान भरोसेच आहे. राजवाडा मार्गावर अॅड. सतीश जैनवार यांच्या घरी भाड्याच्या खोली एसबीआय बँक प्रशासनाने सदर एटीएम मशीन लावली आहे. पोलीससह विविध विभागाचे कर्मचारी तसेच इतर लोक येथे पैसे काढण्यासाठी गर्दी करतात. मात्र येथे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले नसून सुरक्षेअभावी कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसा प्रकार झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. सध्या पावसाळ्याच्या दिवस सुरू झाल्याने गावातील मोकाट जनावरे या एटीएम केंद्रात येऊन बसतात. या मोकाट जनावरांचा नागरिकांना त्रास होतो. एटीएम फोडले, एटीएममधून काढलेले पैसे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले अशा घटना अनेक घडल्या आहेत. असे असतानाही बँक प्रशासनाने या एटीएम केंद्राच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली नाही. त्यामुळे येथील नागरिक असुरक्षिततेच्या भावनेत कसेबसे पैसे काढतात. बँक प्रशासनाने या एटीएम केंद्रात सुरक्षा रक्षक तैनात करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. राज्यासह देशभरात एटीएम फोडल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र या एटीएमच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष आहे.एसी बंद;वीज गेल्यावर अंधारबँक प्रशासनाच्या वतीने सदर एटीएममध्ये एसी लावण्यात आली आहे. मात्र सदर एसी बहुतांशवेळा बंदच राहते. उन्हाळ्यातही अनेक दिवस एसी बंद होता. विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर या एटीएम केंद्रात पूर्णत: अंधार असतो. इन्व्हर्टरची येथे व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांना अंधारात सुरू असलेल्या एटीएममधून पैसे काढावे लागतात.
अहेरीच्या एटीएम केंद्रात भरला मोकाट गुरांचा बाजार
By admin | Published: July 01, 2016 1:23 AM