भाजीबाजारावर परिणाम
लॉकडाऊनमध्ये भाजीबाजार सुरू ठेवण्याची परवानगी असली तरी त्याबद्दलची माहिती भाजी विक्रेत्यांना नव्हती. त्यामुळे गडचिरोलीतील दैनंदिन भाजीबाजार असलेल्या गुजरीत गुरुवारी माेजकीच दुकाने लागली होती. पुढील दोन दिवसांत ही दुकाने वाढण्याची शक्यता आहे. या ठिकाणी दोन दुकानांमध्ये अंतर ठेवून बसण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे.
पोलिसांकडून ४३ जणांवर कारवाई
गडचिरोली वाहतूक नियंत्रण शाखेकडून गुरुवारी इंदिरा गांधी चौक, कारगिल चौक या भागात विनाकारण फिरणाऱ्या, विनामास्क असणाऱ्या आणि विनापरवाना वाहन चालविणाऱ्या अशा ४३ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे वाहतूक शाखेच्या एपीआय गोरे यांनी सांगितले.
न.प.ने केले दुकान सील
संचारबंदी आणि कोरोनाच्या नियमांची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी गुरुवारी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वात महसूल, नगर परिषद आणि पोलीस विभागाने इंदिरा गांधी चौक, बस डेपो, गुजरी आणि मार्केट लाइनमध्ये फिरून नागरिक व दुकानदारांना विविध सूचना केल्या. यादरम्यान आठवडी बाजारातील हिमालया वनस्पती आयुर्वेदिक भंडार येथे काही मुले गुटखा व खर्रा विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून दुकान सील केले. यावेळी बेशिस्त नागरिकांकडून ३४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत मुख्याधिकारी संजीव ओहोळ, अनिल गोवर्धन, पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार प्रामुख्याने सहभागी होते.
अनेक बसफेऱ्या झाल्या रद्द
लॉकडाऊनमुळे प्रवाशांचा प्रतिसाद न मिळणाऱ्या मार्गावरील ७० ते ८० टक्के बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. मोजक्याच बसफेऱ्या सुरू असल्यामुळे गडचिरोली बसस्थानकात प्रवाशांना काही वेळ ताटकळत राहावे लागले. विशेष म्हणजे बसगाड्यांमध्ये आसन क्षमतेएवढेच प्रवासी घेतले जात होते. बसस्थानकात लागणाऱ्या बसमध्येही अंतर राहावे म्हणून प्रत्येक दोन फलाटांच्या मधातील एका फलाटावर दोराचे कुंपण केले होते.