गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कन्सोबा येथील धान खरेदी केंद्रातील सहा कोटींच्या खरेदी घोटाळ्याची व्याप्ती वाढतच चालली आहे. या प्रकरणात दोन अधिकाऱ्यांना अटक केली होती. ७ जूनला रात्री आणखी एका अधिकाऱ्यास जेरबंद केले आहे. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या तीन झाली आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालय, घोट अंतर्गत मार्कंडा (कन्सोबा) येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम २०२२-२३ या दरम्यान झालेल्या अपहार प्रकरणात यापूर्वी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळालेली आहे. महामंडळाचा तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार, तत्कालीन केंद्रप्रमुख व्यंकटी बुर्ले यांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणातील महामंडळाचा विपणन निरीक्षक तथा प्रतवारीकार राकेश सहदेव मडावी याचाही सहभाग आढळून आलेला आहे. त्यास ६ जून रोजी जेरबंद करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पो.नि. उल्हास भुसारी , सहायक निरीक्षक राहुल आव्हाड, उपनिरीक्षक सरीता मरकाम यांनी ही कारवाई केली.
आणखी काही अधिकारी रडारवारधान खरेदी घोटाळ्याशी संबंधित आणखी काही अधिकारी असून ते देखील तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. काहींचा या घोटाळ्यात सहभाग आढळलेला असून त्यादृष्टीने अधिक तपास सुरु आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. उल्हास भुसारी यांनी दिली.