लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये बसून प्रवास करणाऱ्या गरोदर मातेला प्रसुतीच्या कळा जाणवू लागल्या. मार्गातच बस थांबवून पुरूष प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. बसमधील महिला प्रवाशांनी सदर महिलेची प्रसुती केली. चित्रपटात शोभणारा प्रसंग साकोली-चंद्रपूर बसमध्ये मंगळवारी घडला.राज्य परिवहन महामंडळाची साकोली आगाराची एमएच ४० एन ९५६७ या क्रमांकाची बस गडचिरोली मार्गे चंद्रपूरला जात होती. बसमध्ये देसाईगंज येथून लाखांदूर तालुक्यातील मांडळ येथील भाग्यश्री महेंद्र राऊत ही गरोदर माता आरमोरीकडे यायला निघाली. देसाईगंज येथून बस सुटल्यानंतर काही वेळातच तिला प्रसुतीच्या वेदना होण्यास सुरूवात झाली. ही बाब प्रवाशी व बसचे वाहक यांच्या लक्षात आली. आरमोरी पुन्हा बरीच दूर असल्याने रूग्णालयात वेळेवर पोहोचणे कठीण होते. त्यामुळे बसमध्येच प्रसुती करण्याचा निर्णय घेण्यात आला. आरमोरी-देसाईगंज मार्गावरील कासवी फाट्याजवळ बस थांबविण्यात आली. सर्व पुरूष प्रवाशांना बसमधून खाली उतरविण्यात आले. गरोदर महिलेसोबत असलेल्या दोन महिला व इतर प्रवाशी महिलांनी गरोदर महिलेची एसटीमध्येच सुखरूप प्रसुती केली. त्यानंतर सर्व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. प्रसुतीनंतर गरोदर माता व नवजात बालक व प्रवाशांना घेऊन बस थेट उपजिल्हा रूग्णालय आरमोरी येथे नेण्यात आली. त्या ठिकाणी तिला भरती केले. तिच्या बाळाचे वजन कमी असल्याने मंगळवारी सायंकाळी तिला जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले. प्रसुतीच्या कार्यात बस चालक विलास गेडाम व वाहक योगेश भारवे यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. प्रसुत महिलेच्या नातेवाईकांनी चालक, वाहक व इतर प्रवाशांचे कौतुक केले.
मातेच्या प्रसुतीसाठी एसटी बस बनले प्रसुतिगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 6:00 AM
राज्य परिवहन महामंडळाची साकोली आगाराची एमएच ४० एन ९५६७ या क्रमांकाची बस गडचिरोली मार्गे चंद्रपूरला जात होती. बसमध्ये देसाईगंज येथून लाखांदूर तालुक्यातील मांडळ येथील भाग्यश्री महेंद्र राऊत ही गरोदर माता आरमोरीकडे यायला निघाली. देसाईगंज येथून बस सुटल्यानंतर काही वेळातच तिला प्रसुतीच्या वेदना होण्यास सुरूवात झाली. ही बाब प्रवाशी व बसचे वाहक यांच्या लक्षात आली.
ठळक मुद्देकासवीजवळ थांबविली बस : साकोली-चंद्रपूर बसमधील प्रकार, महिला प्रवाशांनी केली मदत