कुटीर उद्याेग पूर्वपदावर
गडचिराेली : जिल्ह्यात शेतीवर आधारित अनेक कुटीर उद्याेग आहेत. लाॅकडाऊनच्या कालावधीत हे सर्व उद्याेग बंद पडले हाेते. अनलाॅकची प्रक्रिया राबविल्यानंतर, आता हे उद्याेग पुन्हा हळूहळू सुरू हाेत आहेत.
औद्योगिक वसाहतीचे काम थंडबस्त्यात
धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, याबाबत शासनस्तरावरून अंमलबजावणी करण्यात आली नाही.
बॉयोमेट्रिक मशीन बंद; कर्मचारी बिनधास्त
आलापल्ली : अहेरी तालुका मुख्यालयातील शासकीय कार्यालयात कर्मचारी, अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहावेत, याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बॉयोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत, मात्र सध्या त्या बंद आहेत.
ट्रॅक्टर\ चालकांसाठी परवाना शिबिराची गरज
एटापल्ली : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूकविषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरुण ट्रॅक्टर चालवितात. गेल्या पाच वर्षांत अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरधारकांसाठी शिबिराची गरज आहे.
गतिरोधकाची गरज
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने गोगाव येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधकाअभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी गतिराेधकाचे बांधकाम करावे, अशी मागणी आहे.
मिरकलात वीज नाही
अहेरी : तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या मिरकल गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेंतर्गतही या गावाला रस्ता बांधून देण्यात आला नाही. त्यामुळे जंगलातून जाणाऱ्या पायवाटेने हे गाव गाठावे लागते. विजेचे खांब लावले. मात्र, वीज पाेहाेचली नाही.
बाजारातील गाळे द्या
गडचिराेली : शहरातील आठवडी बाजारातील गाळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. हे गाळे दुकानदारांना दुकान टाकण्यासाठी किरायाने उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे. या दुकान गाळ्यांच्या माध्यमातून अनेक युवकांना राेजगारासाठी स्थायी स्वरूपाची जागा उपलब्ध हाेण्यास मदत हाेणार आहे.
अनेक पथदिवे बंद
गडचिराेली : आरमाेरी मार्गावर कठाणी नदीपर्यंत पथदिवे लावण्यात आले आहेत. मात्र, यातील अनेक पथदिवे बंद आहेत. या मार्गावर रात्री व पहाटेला शेकडाे नागरिक फिरण्यासाठी जातात. त्यामुळे नगर परिषदेने या मार्गावर पथदिवे लावले आहेत. मात्र, यातील बरेच पथदिवे सद्य:स्थितीत बंद पडून आहेत.
नाल्या तुंबल्या
सिराेंचा : नगरपंचायतीच्या वतीने शहरातील नाल्यांचा नियमितपणे उपसा केला जात नाही. त्यामुळे अनेक नाल्या तुंबल्या आहेत. काही नाल्या तर वर्षातून एकदाच पावसाळ्यापूर्वी उपसल्या जातात. ही अतिशय गंभीर बाब आहे. नगरपंचायत स्वच्छतेसाठी आग्रह धरत असताना, स्वत:च स्वच्छतेकडे दुर्लक्ष करते.
खासगी स्पर्धक गरजेचे
धानाेरा : तालुक्यात खासगी कंपन्यांचे माेबाइल टाॅवर नाहीच्या बराेबरीत आहेत. त्यामुळे बीएसएनएलची एकाधिकारशाही आहे. ९० टक्के ग्राहक बीएसएनएलचे आहेत. मात्र, बीएसएनएलने सेवेत सुधारणा केली नसल्याने ग्राहक कमालीचे त्रस्त आहेत.
वाहतुकीची काेंडी
गडचिराेली : चामाेर्शी राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही. त्यामुळे शहरातून एकतर्फी वाहतूक करण्यात आली आहे. दाेन माेठमाेठी वाहने समाेरासमाेर आल्यानंतर वाहतुकीची माेठ्या प्रमाणात काेंडी हाेते. दुसऱ्या बाजूचे काम सुरू करण्याची मागणी हाेत आहे.
सुविधेपासून ग्रा.पं. वंचित
भामरागड : ग्रामपंचायत स्तरावरील संपूर्ण दस्तावेज ऑनलाइन करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. मात्र अजूनही भामरागड, सिरोंचा तालुक्यातील बऱ्याचशा ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या नाहीत. त्यामुळे आधुनिक सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे नागरिकांना लाभ मिळत नाही.
अट शिथिल करा
गडचिरोली : गैरआदिवासी नागरिकांना वनपट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. सदर अट शिथिल करण्याची मागणी आहे. शेकडो दावे तहसीलदारांमार्फत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत.
झाडांच्या फांद्या तोडा
चामोर्शी : तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांमध्ये वीज तारांलगत मोठमोठी झाडे आहेत. शिवाय फांद्या वाढल्याने त्या तारांना स्पर्श करीत आहेत. वादळामुळे झाडाच्या फांद्या तारांवर पडल्यास तार तुटून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरणने वीज तारांलगतच्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात.
सोयीसुविधांचा अभाव
गडचिरोली : शहरालगत चामोर्शी मार्गावर कैकाडी समाजबांधवांची वस्ती आहे. मात्र, येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. कैकाडी वस्तीतील नागरिक प्रत्येक निवडणुकीत मतदान करतात. मात्र, त्यांना नागरी सुविधा मिळत नाहीत. येथे सुविधा पुरवाव्यात.
स्वच्छतागृहे बांधा
आरमोरी : शहरात सार्वजनिक शौचालये नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित शौचालये तयार केली आहेत. त्यामुळे जवळपासचे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांचा अभाव आहे.