काेरची : तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या मयालघाट गावात अजूनही भाैतिक साेयीसुविधा पाेहाेचल्या नाहीत. गाेदिंया, गडचिराेली जिल्ह्याच्या सीमेवर हे गाव वसले आहे. या ठिकाणी चवथीपर्यंत शाळा आहे. हे गाव जंगलाने वेढले आहे. त्यामुळे हे गाव दुर्लक्षित असल्याने गावात साेयीसुविधा पुरविण्याची मागणी आहे.
योजनांबद्दल अनभिज्ञता
भामरागड : कृषी, महसूल व वन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावांमध्ये पोहोचत नसल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांना योजनांची माहिती नाही.
ओपन स्पेस बनले कचऱ्याचे केंद्र
देसाईगंज : प्रत्येक वॉर्डात ओपन स्पेस तयार करून संरक्षक भिंती बांधण्यात आल्या. काही ठिकाणी लोखंडी गेट उभारण्यात आले. मात्र या ओपस स्पेसवर नियंत्रण न ठेवल्याने या ओपन स्पेसमध्ये कचरा टाकला जात आहे. नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात स्वच्छतेचे काम मंदावल्याचे दिसते.
धानाेरात वाढीव खांब देण्याची मागणी
धानोरा : शहरातील वॉर्डांमध्ये वाढीव विद्युत खांब लावून वीज पुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागात रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.
बंद पथदिवे बदलविण्याची मागणी
सिरोंचा : शहरातील काही वॉर्डातील पथदिवे बंद अवस्थेत आहेत. या भागातील नागरिकांना रात्रीच्या सुमारास आवागमन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे बंद पथदिवे तत्काळ बदलावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा त्रास हाेत आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढला
गडचिरोली : शहरातील कॅम्प एरियातील अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कॅम्प एरियात नियमित डास प्रतिबंधक फवारणी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
नियमाचे उल्लंघन
देसाईगंज : गावातील अंतर्गत रस्त्यांवर उघड्यावर खुलेआम खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे़. हल्ली उघड्यावर खाद्य पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ दुकानदारांवर कारवाईची मागणी आहे. सातत्याने मागणी करूनही कारवाई केली नाही. प्रशासन सुस्त असल्याचे दिसून येते.
वाहतुकीची काेंडी
गडचिराेली : चामाेर्शी राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही. त्यामुळे शहरातून एकतर्फी वाहतूक करण्यात आली आहे. दाेन माेठमाेठी वाहने समाेरासमाेर आल्यानंतर वाहतुकीची काेंडी माेठ्या प्रमाणात हाेते. दुसऱ्या बाजूचे काम सुरू करण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून हाेत आहे.
वीज वारंवार खंडित
गडचिरोली : सततच्या विजेच्या लपंडावामुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. दिवसातून आठ ते दहा वेळा वीज पुरवठा खंडीत होत असल्याने घरातील विद्युत उपकरणे खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गडचिरोली तालुक्यातील साखरा, काटली, नगरी, मोहझरी या भागात कमी वीज दाबाचा पुरवठा होत आहे.
पुलावरून खडतर प्रवास
धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल दोन वर्षापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्यात विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ किमी अंतर कापून धानोरा व गडचिरोली मुख्यालय गाठावे लागते.
‘त्या’ विद्युत खांबाने धाेका
सिरोंचा : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलविण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष झाले. नागरिकांनी आंदाेलनाचा इशारा दिला.