गडचिरोली : छत्तीसगडच्या बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात रविवारी उडालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या २२ जवानांना शहीद व्हावे लागले, तर एक जवान अजूनही बेपत्ता आहे. अत्याधुनिक शस्रांसह सज्ज असूनही सुरक्षा दलाचे जवान नक्षल्यांच्या चक्रव्यूहात फसण्यामागे त्या भागातील विपरीत भौगोलिक परिस्थिती कारणीभूत ठरल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, ही घटना घडली ते स्थळ गडचिरोली जिल्ह्यापासून १५० किलोमीटरपेक्षा जास्त लांब असले तरी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात रेड अलर्ट जारी करून सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.छत्तीसगडच्या बिजापूर, सुकमा या जिल्ह्यांमध्ये यापूर्वीही नक्षल्यांनी अनेक घातपाती कारवाया केल्या आहेत. या भागात त्यांच्या कारवाया रोखण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ), विशेष प्रशिक्षित कमांडोंची कोबरा बटालियन, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा राखीव गार्ड (डीआरजी) अशा विविध दलांकडून संयुक्तपणे अभियान राबविले जाते. या दलांना नक्षल्यांच्या पीएलजीए बटालियन नंबर-१चा कमांडर हिडमा आपल्या सहकाऱ्यांसह त्या भागात असल्याची माहिती मिळाली होती. त्याचा माग घेत सुरक्षा दलाचे जवान बिजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवरील जोनागुडा, टेकलगुडम आणि जिरगाव भागात गेले. पण दोन पर्वतांमध्ये असलेल्या या सुरक्षा दलाच्या जवानांना नक्षल्यांनी ‘यू’ आकारात घेरले. याची कल्पना नसलेले जवान जसजसे पुढे सरकत गेले तसतसे ते नक्षल्यांच्या चक्रव्यूहात फसत गेले आणि त्यांचा घात झाला. मोठ्या संख्येने असलेल्या नक्षल्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. सुरक्षा दलाच्या जवानांनीही जिवाची बाजी लावत प्रखर सामना केला; पण तीन बाजूंनी घेरल्या गेल्याने ते हतबल झाले.१२ नक्षलवाद्यांना मारले?या चकमकीत एका महिला नक्षली कमांडरचा मृतदेह आणि तिची रायफल सुरक्षा दलाच्या हाती लागली. तिची ओळख पटली असून, ती पामेड एलजीएस कमांडर माडवी वनोजा असल्याचे छत्तीसगड पोलिसांनी स्पष्ट केले. उर्वरित जखमी नक्षलवाद्यांना तीन ट्रॅक्टरमधून नक्षलवादी जब्बामरका आणि गोमगुडा या गावांच्या दिशेने घेऊन गेले. या चकमकीत किमान १२ नक्षलवादी मारले गेले, तर १६हून अधिक गंभीर जखमी झाले असण्याची दाट शक्यता छत्तीसगडच्या बिजापूर जिल्हा पोलीस दलाने व्यक्त केली आहे.गडचिरोली-गोंदियात ऑपरेशनची तयारी, जंगलात कोम्बिंग सुरूनागपूर : छत्तीसगडमधील बीजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली-गोंदियातील जंगलांत सी-६० सह सुरक्षा दलाच्या विविध पार्ट्यांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केेले आहे. बीजापूरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर तिकडच्या अनेक नक्षल्यांनी धरपकड तीव्र झाल्याच्या पार्श्वभूमीवर रेस्टझोनकडे (गडचिरोली-गोंदिया) पलायन केल्याचे वृत्त आल्याने इकडच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. यावर्षीच्या सुरुवातीपासूनच गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्रातील सुरक्षा यंत्रणांनी नक्षल्यांची नांगी ठेचण्याची मोहीम तीव्र केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील विविध जंगलांत गेल्या तीन महिन्यांत नक्षल्यांसोबत पोलिसांच्या सात चकमकी झाल्या आहेत. यात पाच नक्षल्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले असून, पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक केली आहे, तर ४ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे बॅकफूटवर गेलेले नक्षलवादी मोठा घातपात करण्याच्या तयारीत असल्याची खास सूत्रांची माहिती आहे.
भौगोलिक परिस्थितीमुळे जवान नक्षल्यांच्या चक्रव्यूहात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 3:03 AM