गडचिरोली : भात रोवणीची जुनी पारंपरिक पद्धती अधिक खर्चाची व प्रचंड वेळ घालविणारी आहे. परिणामी या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना फायदा होतांना दिसून येत नाही. यामुळे कृषी विभागाने सार्वजनिक व खासगी भागीदारी तत्वावर यंत्राद्धारे भात पिकाची रोवणी हा प्रकल्प सुरू केला आहे. ही पद्धत अत्यंत सुलभ व सोयीस्कर आहे, असे जि. प. चे कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर यांनी पारडी येथे प्रात्यक्षिकादरम्यान शेतकऱ्यांना सांगितले. यांत्रिकीद्वारे भात रोवणीचे प्रामुख्याने तीन टप्पे आहे. पहिला टप्पा मॅट नर्सरी तयार करणे, दुसरा रोवणी करण्यासाठी बांधी तयार करणे व तिसरा टप्पा प्रत्यक्ष यंत्राद्धारे भात पिकाची रोवणी करणे आदी आहेत, असेही विजय कोळेकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. या पद्धतीसाठी सर्वप्रथम मॅट नर्सरी तयार करण्यासाठी शेतात चिखल तयार करावा. एक एकर क्षेत्रासाठी १.२ मीटर रूंदीचे व १० मीटर लांबीचे दोन बेड तयार करावे, त्यासाठी प्रथम रोपवाटीकेतील जमीन समपातळीत आणावी, दोन बेडमध्ये पाणी निघून जाण्यासाठी अंतर ठेवावे, यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी जाडी २१ सेमी बाय ५५ सेमी बाय २ सेमी या आकाराची फ्रेम वापरावी. रोपवाटीकेसाठी वापरावयाच्या मातीत कम्पोस्ट व गांडूळ खत मिसळवावे, गाळाची माती असल्यास मातीत वाळू मिसळवावी, असेही कोळेकर यांनी यावेळी सांगितले. रोप वाटीकेतील मातीवर मोड आलेले धान्य अलगतपणे पसरवावे. सदर बियाणे अतिदाट किंवा विरळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. धान पक्ष्यांनी खाऊ नये यासाठी सदर धान तणसीने झाकून टाकायचे. त्यावर थोडेसे पाणी टाकावे, सतत तीन ते चार दिवस दिवसातून दोन ते तीन वेळा झारीच्या सहाय्याने पाणी द्यावे. या मॅट नर्सरीमध्ये प्लॅस्टीकच्यावर एक इंचपर्यंतच शेतात पाणी ठेवावे, अधिक पाण्याची गरज नाही. चौथ्या दिवशी रोपवाटीका हिरवी दिसू लागली की, त्यावर झाकलेला पेंडा/तणीस हळूहळू बाजूला काढावे आणि रोपवाटीकेत पाणी सोडावे. रोपांच्या निम्य उंचीपर्यंत पाणी वाफ्यात असावे, रोपवाटीकेतील रोपांवर युरियाची फवारणी करू नये, यांत्रिकीकरणाद्वारे रोवणीसाठी १२ ते १५ सेमी उंचीची रोपे १५ ते १८ दिवसात तयार होतात. त्यानंतर रोवणी करण्यासाठी बांधी तयार करावी, यात कमी खोलीची म्हणजे १० ते १५ से.मी. खोल चिखलणी पॉवर टीलरच्या सहाय्याने करावे, चिखलनीनंतर लगेच रोवणी करू नये, रोवणीसाठी केलेला चिखल व्यवस्थित स्थिर होऊ द्यावा, बांधीतील अतिरिक्त जादा पाणी बाहेर काढून द्यावे, रोवणीपूर्वी रोपवाटीकेतीलही पाणी काढून घ्यावे, त्यानंतर भात रोवणी यंत्राद्वारे रोवणी करावी. एका फेरीमध्ये आठ ओळींची रोवणी होते. दोन ओळींमधील अंतर २२ ते २४ से. मी. ठेवता येते, असेही कोळेकर यांनी शेतकऱ्यांना सांगितले. शेतकरी गटाला ९० टक्के अनुदानावर तर वैयक्तीकरीत्या शेतकऱ्याला ५० टक्के अनुदानावर सदर यंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच धान रोवणी यंत्राद्वारे धान पिकाची रोवणी केली जाणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
यांत्रिक रोवणी सुलभ पद्धती
By admin | Published: June 13, 2014 12:10 AM