लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वाहन चालविण्यासाठी लर्निंग लायसन्स काढणे आता पूर्वीप्रमाणे सोपे राहिलेले नाही. आधी घरी बसून ऑनलाईन फॉर्म भरून आणि काही कागदपत्रे ऑनलाईन जोडून हे लायसन्स कोणालाही काढता येत होते. आता त्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. ज्या डॉक्टरांनी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर यशस्वीपणे नोंदणी केली त्यांनाच हे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार राहणार आहे. वाहन चालविणारा आणि विशेषत: मालवाहू वाहनासाठी लायसन्स घेणारी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या पूर्ण सक्षम असणे गरजेचे असते. त्यामुळेच एमबीबीएस डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केल्यानंतरच त्यांना शिकाऊ परवाना दिला जाणार आहे.
ऑनलाईन लायसन्ससाठी ही आवश्यक कागदपत्रेऑनलाईन लर्निंग लायसन्स काढण्याची सुविधा अनेक दिवसांपासून परिवहन विभागाने दिली आहे. त्यासाठी आधार कार्ड, तीन पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र आणि शुल्क आदींची आवश्यकता आहे. आता त्यात एमबीबीएस डॉक्टरांकडील फिटनेस सर्टिफिकेटची भर पडली.
एक महिना मिळणार मुदतवाढ- या नवीन प्रणालीनुसार लायसन्सकरिता फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांनी परिवहन विभागाच्या साईटवर रजिस्ट्रेशन करून युजर आयडी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. परंतु डाॅक्टरांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अनेकांना याबाबतची माहितीच नव्हती. त्यामुळे डॉक्टरांच्या सोयीसाठी एक महिना मुदतवाढ दिली जाणार आहे.
डॉक्टरांना करावे लागणार रजिस्ट्रेशनलायसन्ससाठी फिटनेस प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांना आधी परिवहन विभागाच्या ‘सारथी’ या साईटवर रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यात त्यांना मेडिकल कौन्सिलने दिलेला नोंदणी नंबर, वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र आदींच्या माहितीची पडताळणी केली जाईल. त्यानंतर त्यांना परिवहन विभागाकडून युजर आयडी मिळेल. त्यानुसार ते डॉक्टर प्रमाणपत्र देतील.