दुर्गम भागातील वास्तव : अनेक डॉक्टर सेवा बजाविण्यासाठी जातही नाहीगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात केवळ सरकारी आरोग्य सेवेच्या भरवशावरच नागरिकांचे जीवनमान अवलंबून आहे. ४५ आरोग्य केंद्रात ९० डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असल्या तरी नक्षलग्रस्त संवेदनशील भागात अनेक दवाखान्यांचा कारभार एकाच डॉक्टरच्या भरवशावर चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन डॉक्टर शासनाने नियुक्त केले असले तरी १५ दिवस एक डॉक्टर व दुसरे १५ दिवस दुसरा डॉक्टर असा क्रम ठरवून ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुरू असल्याचे वास्तविक चित्र आहे.भामरागड तालुक्यात क्वचित डॉक्टर मुख्यालयी राहतात. आरमोरी तालुक्यातील दुर्गम भागातही अशीच परिस्थिती आहे. एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा, कोरची या तालुक्यात वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाही. ते शहरातून किंवा तालुका मुख्यालयातून ये-जा करतात. काही डॉक्टर नागपुरात राहून गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यात सेवा देत आहेत. त्यांचा पगारही व्यवस्थीतपणे काढण्याचे पुण्यकर्म जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग करीत आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्तामुळे अनेक खास डॉक्टरांना जिल्हा मुख्यालयात प्रतिनियुक्तीवर घेण्यात आले आहे. तसेच गट अ दर्जाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्त करा, असे स्पष्ट आदेश आरोग्य प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले असतांनाही गडचिरोली जिल्ह्यात गट ब च्याही वैद्यकीय अधिकाऱ्यांना गट अ च्या दर्जाचे पद राजरोसपणे सांभाळण्यासाठी दिले जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे उडालेले आहे.अहेरी तालुक्याच्या कमलापूर आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नाही. आरमोरी तालुक्याच्या भाकरोंडी आरोग्य केंद्रातही वैद्यकीय अधिकारी नाही. अहेरी तालुक्यात अनेक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत आरोग्य सेवा ढासळलेली आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात एकूण ४५ आरोग्य केंद्र आहेत. यात गडचिरोली तालुक्यात ४ आरमोरी ४, देसाईगंज ३, कुरखेडा ३, कोरची २, धानोरा ५, एटापल्ली ३, भामरागड ३, सिरोंचा ४, अहेरी ५, मुलचेरा ३ व चामोर्शी तालुक्यात ६ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय जि. प. आरोग्य विभागांतर्गत ३६ आरोग्य पथकांमध्ये प्रत्येकी एका डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आयुर्वेदिक दवाखाने ५, अॅलोपॅथीक दवाखाने २ असून या ठिकाणी प्रत्येकी एका डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच ३ मेडिकल मोबाईल युनिटमध्ये ३ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जि. प. च्या आरोग्य विभागाने दिली आहे. तर गट ‘ब’ चे ३८ व गट ‘अ’ चे २ असे एकूण ४० डॉक्टर अस्थायी म्हणून कार्यरत आहेत. नवसंजीवनी योजनेंतर्गत दुर्गम भागातील उपकेंद्राच्या ठिकाणी ३० वैद्यकीय अधिकाऱ्यांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. या डॉक्टरांना नवसंजीवनी योजनेतून ६ हजार व एनआरएचएमच्या निधीतून १२ हजार असे एकूण १८ हजार रूपये मानधन दिल्या जाते. जि. प. च्या आरोग्य विभागांतर्गत मोठ्या प्रमाणात डॉक्टरांसह अन्यपदे रिक्त आहेत. याशिवाय जिल्ह्याच्या आरोग्यसेवेत एकूण १३६ डॉक्टर कार्यरत असले तरी बहुतांश डॉक्टर केवळ पगार मिळविण्यापुरतेच काम करीत असल्याचे दिसून येते. अनेक डॉक्टर गडचिरोली जिल्हा मुख्यालयी राहून दुर्गम भागात सेवारत आहे. त्यांचे आरोग्य केंद्राला दर्शन अमावस्या, पौर्णिमेसारखेच आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
एकाच डॉक्टरच्या भरवशावर दवाखाना
By admin | Published: November 17, 2014 10:52 PM