NCP ( Marathi News ) : खासदार शरद पवार यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. मंत्री बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी आज 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे आता विधानसभा निवडणुकीत मंत्री बाबा आत्राम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यात विधानसभा निवडणुका काही दिवसातच जाहीर होणार आहेत, याआधी राजकीय पक्षांनी तयारी केली. आज गडचिरोली येथे जाहीर पक्षप्रवेश झाला. दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
यावेळी बोलताना मेहबूब शेख म्हणाले की, "आठ दिवसापूर्वी इथे एक यात्रा झाली, ती यात्रा म्हणजे जनअपमान यात्रा. त्या यात्रेचे नाव जनसन्मान यात्रा असायलाच नाही पाहिजे, कारण जनतेसोबत गद्दारी करुन जी यात्रा निघते ती यात्रा जनअपमान यात्रा असते, असा टोलाही मेहबुब शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेला लगावला.
"...तोपर्यंत या देशातून भाजपची सत्ता जाणार नाही", जयंत पाटील नेमकं काय बोलले?
'त्या यात्रेत बाबा आत्राम यांनी आपल्या मुलीबाबत विधान केले. त्यांना मुलगी सोडून जाते याचा राग अनावर झाला. 'आत्राम म्हणाले की, त्यांना नदीमध्ये फेकले पाहिजे',आत्राम साहेब तुमची मुलगी आहे, राग येणा साहजीक आहे. पण तुम्ही भाग्यश्री ताईला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. तर तुम्हाला आता ताईला भाग्यश्री ताईला नदीत फेकावे वाटले, एवढा राग आला. पण, बाबा तुमच्या स्टेजवर जे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार बसले होते. त्या अजितदादांना त्यांच्या चुलत्यांनी वडिलांप्रमाणे सांभाळले. त्यांना तीनवेळा राज्याचे उपमुख्यमंत्री केले, त्यांना विरोधीपक्षनेता केले, त्यांना आमदार केले, राज्यमंत्री केले १८ वर्षे सोन्याचा चमचा तोंडात दिला. त्या अजितदादांनी स्वत:च्या काकाच्या पाठीत सूरा खूपसला त्यांना कुठे फेकायचे हे पण सांगून टाका',अशी टीकाही मेहबूब शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली.
"अजितदादा तुम्ही त्या कार्यक्रमात सांगता भाग्यश्रीताईला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले ती बापाची झाली नाही ती जनतेची काय होणार. मग दादा तुम्ही देखील काकांचे झाले नाहीत, मग लोकांचे काय होणार, असंही शेख म्हणाले. भाग्यश्री ताई तुमच्या प्रवेशाने अजितदादा म्हणाले वस्ताद एक डाव शिल्लक ठेवत असतो. तसे तुम्हाला अजून काकांचा एक डाव शिल्लक आहे, असा निशाणाही अजित पवार यांच्यावर साधला.