उद्यानाची व्यवस्था करण्याची मागणी : सौंदर्यीकरणाकडे नगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहेरी येथील तलाव सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून येथे प्रचंड अस्वच्छता आहे. परिणामी दुर्गंधी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाने सदर तलावाचे सौंदर्यीकरण करून सार्वजनिक उद्यान तयार करावे, अशी मागणी नगरसेविका कमल पडगेलवार व प्रभाग क्र. १४ च्या नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, अहेरी येथील सदर लहान तलावात कित्येक वर्षापासून राज परिवारातर्फे दसऱ्याच्या आदल्या दिवशी शस्त्रपूजा केली जाते. या कार्यक्रमासाठी अहेरी उपविभागातील हजारो नागरिक उपस्थित राहतात. मात्र सध्या या तलावाची स्थिती अत्यंत वाईट आहे. सदर तलावाचे खोलीकरण केल्यास पाणी साठवणूक होईल. परिणामी मत्स्य बिज वाढून मत्स्य व्यवसायास चालना मिळेल. गावातील सर्व कचरा या तलावात फेकल्या जाते. त्यामुळे प्रचंड अस्वच्छता येथे निर्माण झाली आहे. अहेरी नगरात सार्वजनिक उद्यानाची व्यवस्था नाही. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाने तलावाच्या आजूबाजुला असलेले अतिक्रमण काढून या तलावाचे सौंदर्यीकरण करावे, जेणेकरून उद्यानाची निर्मिती होईल, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर तलावातील अतिक्रमण काढून खोलीकरण केल्यास सिंचन सुविधाही निर्माण होऊ शकते, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना नगरपंचायतीचे स्वच्छता सभापती नारायण सिडाम, पाणीपुरवठा सभापती श्रीनिवास चटारे, दिलीप पडगेलवार, शंकर मगडीवार, रियाज शेख, मखमुर शेख, राजू गांडलावार, मधुकर सुद्धलवार, श्रीनिवास मगडीवार, पोशालू सुर्लावार, महेश बांकेवार, नागेश गुम्मलवार, कृष्णा बांकेवार यांच्यासह भोई समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चाही केली.
तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2017 1:25 AM