मोबाईलवर मेसेज सेवा : आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा उपक्रम गडचिरोली : गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाशी संलग्न आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून यंदा पहिल्यांदाच गोंडी भाषेत उष्णतामानाविषयीची माहिती जनजागृतीपर दिली जात आहे. त्यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागात मोबाईल वापरणाऱ्या नागरिकांना तत्काळ माहिती मिळण्यास सुरूवात झाली आहे. गडचिरोली येथील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे प्रमुख कृष्णा रेड्डी यांनी मागील वर्षापासून काम हाती घेतले आहे. गडचिरोली जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषांमधून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे संदेश देण्यावर त्यांनी भर दिला आहे. यावर्षी विदर्भात उष्णतामान मोठ्या प्रमाणावर राहणार असल्याने याबाबतचा संदेश त्यांनी गोंडी भाषेत तयार केला आहे. या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, ‘ऐदितामार : कमजोर तेदला परवेक, तलाय नोयना, गाबरायना इदामना ऐदितामा उदना चिन्हा पुनेमामटु, झिंग वातेके, डॉक्टरकुन तबेत तोहाट. डीएमसेल गडचिरोली याशिवाय दुपारते १२ ते ३ नेकनाह बाहर बेकेन हन्माटु’, असाही संदेश दिला जात आहे. या संदेशामुळे ज्यांना मराठी भाषा अवगत नाही, अशा आदिवासी बांधवांनाही उष्णतेविषयची माहिती सुलभपणे मिळणे शक्य झाले आहे.प्रचंड प्रमाणात उकाडा वाढत असल्याने नागरिकांनी दुपारी घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसल्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ नजीकच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने केले आहे. विदर्भात आगामी तीन दिवसात उष्णतेची लाट राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
तापमानाचे गोंडी भाषेतूनही संदेश
By admin | Published: April 12, 2017 1:08 AM