गडचिरोली: येथील जिल्हा हिवताप कार्यालयातून पाच लाख रूपये किमतीचे तब्बल १८ मायक्रोस्कोप यंत्र चोरीस गेले होते. याप्रकरणी ‘लाेकमत’ने चालविलेल्या वृत्तमालिकेची दखल घेत प्रशासनाने अखेर भांडारपाल अशोक पवार याला निलंबित केले आहे. या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून पवार यांची पाठराखण करणारे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी देखील आता अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे ही कारवाई दिवाळीच्या सुटया लागण्यापुर्वीच झाली.
जिल्हा हिवताप कार्यालयाने एप्रिल महिन्यात मायक्रोस्कोप यंत्रांची खरेदी केली होती. साठा नोंदवहीत याची नोंद घेतली होती. २२ पैकी चार नग आरोग्य संस्थांना वितरित केले होते तर १८ नग भांडार विभागात ठेवले होते. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात ते चोरीस गेले. ही बाब निदर्शनास आल्यावर गडचिरोली ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस अद्यापही चोरापर्यंत पोहोचू शकले नाहीत.
भांडारपालावर या मायक्रोस्कोपच्या सुरक्षेची जबाबदारी होती, त्यामुळे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. हेमके यांनी संबंधितास नोटीस बजावली. त्याचा २४ तासांच्या आत खुलासा करण्याचे आदेश दिले. भांडारपालाने पाच दिवसांनंतर खुलासा केला; पण तो असमाधानकारक असल्याने पुढील कारवाईसाठी अहवाल उपसंचालकांना पाठविण्यात आला हाेता. आता भांडारपालावर कारवाई झाल्याने आराेग्य विभागात खळबळ माजली आहे.
प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पंकज हेमके यांनी या प्रकरणात भांडारपाल अशोक पवार यांच्यावर निष्काळजी व हलगर्जीपणाचा ठपका ठेवत २१ सप्टेंबर २०२३ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली. याचा पवार यांनी खुलासाही दिला होता. परंतु आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्याने भांडारपाल पवार यांची पाठराखण केल्या जात होती. ‘लोकमत’ने हे प्रकरण लावून धरल्यानंतर अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार डॉ. हेमके यांनी पवार यांना निलंबित केले. याविषयी डॉ. हेमके यांना विचारणा केली असता त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.
आता धानाेराच्या कार्यालयात हजेरीभांडारपाल अशाेक पवार यांच्याकडे स्टाेअररूमची संपुर्ण जबाबदारी हाेती. तेथील औषधसाठा व इतर साहित्यांवर लक्ष ठेवण्याचीही जबाबदारी त्यांच्याकडे हाेती. प्राथमिक आराेग्य केंद्रांना औषधसाठा पुरवठा त्यांच्या समक्ष हाेत हाेता. मात्र येथील मायक्रोस्कोप चाेरीच्या घटना दाेनदा उघडकीस आल्या हाेत्या. ही दुसरी घटना आहे. या प्रकरर्णी उशिरा का हाेईना भांडारपालावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन काळात अशाेक पवार यांना धानोरा हत्तीरोग पथकात हजेरी लावावी लागणार आहे.