गडचिराेली जिल्ह्यात सिंचनाच्या साधनांचा अभाव आहे. माेजक्याच शेतकऱ्यांकडे सिंचनाची साेय असल्याने ते वर्षभर शेती कसत आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची साेय नाही, असे शेतकरी पावसाच्या पाण्यावर शेती करतात. जाेगीसाखरा परिसरात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार २७-२८ वर्षांपूर्वी गावालगतच्या नाल्यावर सिंचनासाठी बंधारे बांधण्यात आले. परंतु त्यांचा उपयाेग शेतकऱ्यांना झाला नाही. नाल्यावरील बंधाऱ्यातून पाणी नेण्यासाठी मोठे पाॅवर हाऊस बांधून माेटारीसुद्धा बसवण्यात आल्या. परंतु शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्थापन समिती गठित करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यासाठी सिंचन विभागाने लक्ष घातले नाही. परिणामी शेतकऱ्यांचे संघटन न झाल्यामुळे सिंचनाची परिपूर्ण सोय होऊ शकली नाही. सिंचनापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले. शेतकऱ्यांच्या शेतात एकही थेंब पाणी न जाता लाखो रुपये पाण्यात गेले. त्याला सिंचन विभागासोबतच लाभ घेणारे शेतकरीही तेवढेच जबाबदार आहेत.
जाेगीसाखरा परिसरात बहुतांश शेतकऱ्यांनी शेतजमिनीत बाेअर मारले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणी तळाला गेले. सिंचनाशिवाय शेती नाही, हे पटल्याने या परिसरातील शेतकरी सिंचनाची साेय करण्यासाठी धडपडत आहेत. शासनाने नाल्यावरील जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
बाॅक्स
लाभ नसतानाही शेती ओलिताखाली
जाेगीसाखरालगतच्या नाल्यावर बंधारे बांधून येथून शेतापर्यंत पाणी पाेहाेचविण्यासाठी प्रत्येक विहिरीमध्ये मोठी पाईपलाईन आणि सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या; परंतु सिंचन याेजना पूर्णपणे कार्यान्वित न झाल्याने तिचा उपयाेग शेतकऱ्यांना याेग्यप्रकारे हाेऊ शकला नाही. शेताजवळ सिंचन बंधारे असल्याची नोंद सात-बारावर असल्यामुळे शेती ओलिताखाली असल्याचे दर्शविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ घेता येत नाही. बहुतांश शेतकरी अल्पशिक्षित असल्याने त्यांनी सात-बारावरील ही नाेंद काढली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून बंधाऱ्याची दुरुस्ती करावी किंवा शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ द्यावा, अशी मागणी हाेत आहे.