गडचिरोली : जिल्हा खनिकर्म विभागाने २०१३-१४ या आर्थिक वर्षात केवळ १४ कोटी ३४ लाख ६ हजार रूपयांचा महसूल गोळा केला असून शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ८४.३५ टक्के एवढाच महसूल गोळा झाला आहे. जिल्ह्यात नद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने रेती घाट सुद्धा १०० हून अधिक आहेत. या रेती घाटांचा लिलाव करून त्याच्या माध्यमातून शासनाला कोट्यवधी रूपयांचे उत्पन्न प्राप्त होते. सन २०१०-११ या आर्थिक वर्षात ९ कोटी रूपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट जिल्हा खनिकर्म विभागाला देण्यात आले होते. त्यावर्षी ९ कोटी ७५ लाख ३९ हजार रूपयांचा महसूल गोळा झाला. शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या ८ टक्के अधिक महसूल गोळा करण्यात खनिकर्म विभागाच्या व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. २०११-१२ मध्ये १४ कोटीचे उद्दिष्ट असतांना १६ कोटी १६ लाख ६१ हजाराचे उत्पन्न मिळाले. २०१२-१३ यावर्षी १३ कोटी रूपयांचे उद्दिष्ट दिले असतांना १६ कोटी ५३ लाख ३४ हजार रूपयांचा महसूल गोळा झाला. उद्दिष्टाच्या तुलनेत महसूल गोळा होण्याचे प्रमाण १२७.१८ टक्के एवढे आहे. २०१३-१४ या वर्षात १७ कोटींचे उद्दिष्ट असतांना केवळ १४ कोटी ३४ लाख ६ हजार रूपयांचा महसूल गोळा झाला आहे. उद्दिष्टाच्या हे प्रमाण केवळ ८४.३५ टक्के एवढे आहे. मागील तीन वर्षाची आकडेवारी तपासली असता, २०१३-१४ या वर्षात सर्वात कमी उत्पन्न प्राप्त झाले आहे. रेती घाटांचे उशीरा झालेले लिलाव हे मुख्य कारण असल्याचे खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असले तरी चोरीच्या मार्गाने मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. यामध्ये खनिकर्म व महसूल विभागाचे काही अधिकारी गुंतले आहेत. हे सत्यसुद्धा नाकारता येत नाही. रेती तस्करीतून कोट्यवधी रूपयांची उलाढाल होत असल्याने रेती तस्कर अधिकाऱ्यांना मानत नाही. वेळप्रसंगी हल्ला करण्यासही जुमानत नसल्याने तस्करांना पकडण्याचे प्रमाण अल्प झाले आहे. त्यामुळेच खनिकर्म विभागाचे उत्पन्न घटले आहे.
खनिकर्म विभागाचे उत्पन्न घटले
By admin | Published: November 09, 2014 11:20 PM