गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सूरजागड येथे सुरू असलेल्या लोह खाण प्रकल्पावरून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षल्यांनी दोन महिन्यांपूर्वी धमकी दिली होती. दरम्यान, गट्टा (ता.एटापल्ली) परिसरात धर्मरावबाबांसह त्यांचे जावई व अन्य काही लोकांच्या नावे धमकीचे पत्रक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सूरजागड येथे अडीच वर्षांपासून लोह खनिजाचे उत्खनन सुरू आहे. याला नक्षल्यांचा सुरुवातीपासूनच तीव्र विरोध आहे. यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम जबाबदार असून त्यांना किंमत चुकवावी लागेल, अशाप्रकारची धमकी देणारे पत्र गट्टा परिसरात १८ सप्टेंबरला आढळून आले.
हे पत्रक पश्चिम सब झोनल ब्युरो श्रीनिवास याच्या नवे असून यात आत्राम यांचे जावई, त्यांचे भाऊ व कंपनीत कार्यरत काही लोकांची देखील नावे आहेत. वर्षभरात आत्राम यांनी तिसऱ्यांदा नक्षल्यांनी धमकी दिली आहे. हिवाळी अधिवेशनात देखील अशाप्रकारची धमकी मिळाली होती. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री आत्राम यांची सुरक्षा वाढविण्याचे आश्वासन दिले होते.
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना सध्या झेड दर्जाची सुरक्षा आहे. सुरक्षेबाबत आम्ही योग्य ती खबरदारी घेेत आहोत. धमकीपत्रकाबाबत तपास सुरु आहे.- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्याचा विकास व्हावा, इथल्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी माझे प्रयत्न आहेत. सूरजागड लोहप्रकल्पामुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. आपल्या भागाचा विकास व्हावा,इथल्या लोकांचे जीवनमान उंचावे यासाठी मी लढत आहे. अशा धमक्यांना मी महत्त्व देत नाही. - धर्मरावबाबा आत्राम, अन्न व औषध प्रशासन मंत्री