गडचिरोली : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष देत पळवून लैंगिक शोषण करणाºयाला जिल्हा न्यायालयाने गुरूवारी (दि.२६) १० वर्ष सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. हा निकाल विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिशांनी दिला.
हेमंत रामप्रसाद कन्नाके (४०) रा.बोथली हिरापूर, ता.सावली जि.चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीला त्याने लग्नाचे आमिष देऊन आणि फूस लावून चामोर्शी येथील बस स्थानकावरून हैदराबाद येथे नेले आणि तिथे बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. या प्रकारानंतर पीडित मुलीने चामोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वैद्यकीय अहवाल आणि साक्ष पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपी कन्नाके याला कलम ३७६, कलम ६ पोक्सो अन्वये १० वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड, कलम ३६३ अन्वये ५ वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, तसेच कलम ३६६ (अ) अन्वये ५ वर्ष कारावास व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अनिल एस.प्रधान व एन.एम.भांडेकर यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक पी.यु.कापुरे यांनी तर पो.निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.