गडचिरोली : पुरवठा विभागाकडून २५ टक्के कमी रॉकेलचा पुरवठा करण्यात आला असल्याचे रॉकेल ग्राहकांना सांगून कमी रॉकेल देऊन रॉकेल ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे. रात्रीच्या सुमारास दिवा लावण्यासाठी प्रत्येक नागरिकाला केरोसीनची गरज भासत असल्याने केंद्र शासन अनुदान देऊन गोरगरिबांना प्रतिव्यक्ती अर्धा लिटर केरोसीनचा पुरवठा करीत होते. मात्र कालांतराने प्रत्येक घरी विद्युत जोडणी झाल्याने दिव्यासाठी रॉकेलचा होणारा वापर कमी झाला. त्याचबरोबर काही नागरिकांकडे गॅस सिलिंडरही आल्याने रॉकेलचा वापर अत्यंत कमी झाला. त्यामुळे शासनाने २०१२ पासून एकूण नियतनाच्या ३४ टक्के नियतन उपलब्ध करून दिले जात आहे. चालू महिन्यातही ३४ टक्केच रॉकेलचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र काही रॉकेल दुकानदार मागील महिन्यापेक्षा या महिन्यात पुरवठा विभागाकडून २५ टक्के रॉकेल कमी मिळाले असल्याचे ग्राहकांना सांगून त्यांची दिशाभूल करीत आहेत. ग्राहकही दुकानदारांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवत रॉकेल दुकानदार देतील तेवढे रॉकेल स्वीकारत आहेत.नागरिकांना कमी वाटप करून उर्वरित रॉकेल वाहनधारकांना दामदुपटीने विकले जात होते. रॉकेलमधील हा काळाबाजार कमी करण्यासाठी शासनाने रॉकेलचा परवाना महिला बचत गटांना देण्याचे धोरण मागील काही दिवसांपासून अवलंबिले आहे. मात्र महिला बचत गटांमुळेही रॉकेलचा काळाबाजार कमी झाला नाही. महिला बचत गटाच्या नावाने परवाना असला तरी रॉकेलच्या विक्रीचे काम गावातील एखाद्या नागरिकाला दिले जाते. बचत गट त्यावर विशिष्ट प्रमाणात कमिशन आकारून मोकळे होत आहे. सदर दुकानदार वाहनधारकांना रॉकेल विकत असल्याने रॉकेलचा काळाबाजार तसूभरही कमी झाला नाही. (नगर प्रतिनिधी)
रॉकेल दुकानदारांकडून ग्राहकांची दिशाभूल
By admin | Published: November 18, 2014 10:55 PM