चामोर्शी (गडचिरोली) : नागरिकांच्या समस्याबाबत असलेल्या तक्रारीची दखल घेऊन आमदार डाॅ. देवराव हाेळी यांनी लागलीच महावितरणचे चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता सडमेक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून कानउघाडणी केली. दरम्यान, तांबाशी गावातील वाकलेले वीज खांब व लाेंबकळत असलेल्या वीज तारा येत्या दोन दिवसांत बदलविण्याचे स्पष्ट केले. वीज कर्मचाऱ्यांच्या कार्यवाहीनंतर तांबाशीतील वीज धाेका टळणार आहे.
आमदार डॉ. देवराव होळी यांनी तालुक्यातील नवेगाव जवळील तांबाशी येथे भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी येथील राष्ट्रीय महामार्गावरून गावात जाणाऱ्या पुलाजवळ वीज खांब झुकलेले आहेत. या विद्युत खांबावरील तारांना चारशे चाळीस पेक्षा जास्त विद्युत दाब आहे. येथील खांब खाली झुकले असून तारा खाली आल्या आहेत. त्यामुळे केव्हाही मनुष्य व प्राणहानी होऊ शकते, अशी तक्रार नागरिकांनी आमदारांकडे केली. याबाबत वीज वितरण कंपनीकडे तक्रार करूनसुद्धा विद्युत विभागाने कोणतेच लक्ष दिले नाही, असे निदर्शनास आले. त्यानंतर आमदार डॉ. होळी यांनी सदर समस्येबाबत उपविभागीय अभियंता सडमेक यांच्याशी चर्चा केली.
भ्रमणध्वनीवर चांगलीच त्यांची कानउघाडणी केल्यानंतर दोन दिवसांत सदर विद्युत खांब बदलवून देण्याचे आश्वासन अभियंत्यानी दिले. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, भाजप पदाधिकारी साईनाथ बुरडे, भास्कर बुरे, उमेश कुकडे, प्रतीक राठी तसेच गावातील शेतकरी व नागरिक उपस्थित हाेते.