शेततळ्याच्या कामाची केली पाहणी : काम योग्य पद्धतीने करण्याचे निर्देश; शेतकऱ्यांशी चर्चा वैरागड : ‘शेततळ्याचे काम अयोग्य’ या मथळ्याखाली १७ एप्रिलच्या अंकात लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर आमदार क्रिष्णा गजबे यांनी थेट पाटणवाडा येथे बांधावर पोहोचून जेसीबीच्या सहाय्याने खोदण्यात आलेल्या शेततळ्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. सदर काम अयोग्य पध्दतीने झाल्याचे दिसून आल्यावर सदर काम योग्यरित्या करण्याचे निर्देश आमदार गजबे यांनी दिले. वैरागड ग्रामपंचायत अंतर्गत पाटणवाडा येथील नरसू कुमरे यांच्या शेतशिवारात जेसीबीच्या सहाय्याने शेततळ्याचे काम करण्यात आले. शेततळ्याची माती अस्ताव्यस्त पडून असल्याचे आमदार गजबे यांच्या निदर्शनास पाहणीदरम्यान दिसून आले. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून जलयुक्त शिवारच्या कामातून गडचिरोली जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्याच्या काही भागात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा दर्जा सुमार आहे. जलसंधारणाच्या कामात कोणत्याही त्रुटी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून खपवून घेतल्या जाणार नाही, असे आश्वासन आमदार गजबे यांनी पाटणवाडा येथे शेतकऱ्यांना दिले. सदर शेततळ्याची पाळ व्यवस्थित करण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या जातील, असे त्यांनी आश्वासन दिले. याप्रसंगी पाटणवाडाचे पोलीस पाटील परसराम कुमरे व लोकमतचे वार्ताहर प्रदीप बोडणे उपस्थित होते. पाटणवाडा येथे ज्यांच्या शेतात शेततळे झाले, ते शेतकरी केशव कुमरे व नरसू कुमरे यांची कृषी सहायक डी. टी. आंबीलडुके यांच्याबद्दल तक्रार आहे. मात्र शेततळ्याचे काम शासकीय नियमाप्रमाणे व योग्य प्रकारे झाले, असे पोलीस पाटील कुमरे यांच्याकडून जबरदस्तीने लिहून घेण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण झाले नाही. (वार्ताहर)
आमदार थेट पोहोचले पाटणवाडातील शेताच्या बांधावर
By admin | Published: April 20, 2017 2:02 AM