मानापूर ग्रा. पं. ला भेट : थकीत रोहयो मजुरी, चव्हेला प्रकल्पावरही चर्चामानापूर/देलनवाडी : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी मानापूर परिसरातील कुलकुली, भाकरोंडी, दवंडी, खडकी, परसवाडी, कोसरी, मांगदा, देलनवाडी व मानापूर गावांना भेटी दिल्या. तेथील नागरिकांशी चर्चा करून गावातील समस्या जाणून घेतल्या. मानापूर ग्रामपंचायतीच्या सभागृहात ग्रामस्थ व कार्यकर्त्यांशी आमदार गजबे यांनी संवादही साधला. मानापूर जि. प. शाळेत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या ठिकाणी विहीर तसेच हातपंपाची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांनी त्यांना सांगितले. यावर पाणी सुविधा करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. रोजगार हमी योजनेच्या कामावरील अनेक मजुरांची मजुरी गेल्या अनेक दिवसांपासून थकीत आहे, अशी तक्रार ग्रामस्थांनी आमदार गजबे यांच्यापुढे केली. यावर आमदार गजबे यांनी तत्काळ आरमोरीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून रोहयो मजुरांच्या खात्यावर तत्काळ मजुरीचे पैसे वळते करण्याचे निर्देश दिले. यावेळी सभेला प्रकल्पावरही चर्चा करण्यात आली. चव्हेलावासीयांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. देलनवाडी, मानापूर येथील विद्युत डीपी हटविण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली. याशिवाय कोसरी येथे सभामंडप व देलनवाडी येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या प्रांगणात गोदाम निर्मितीसाठी आपण प्रयत्न करू, असेही आमदार गजबे यांनी सांगितले.जांभळी, दवंडी, परसवाडी, खडकी परिसरात गेल्या १५ दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. ही समस्या ग्रामस्थांनी त्यांच्यापुढे मांडली. यावर महावितरणकडे पाठपुरावा करणार, असे त्यांनी सांगितले. खोब्रागडी नदीवर पूल कम बंधारा बांधण्यात येईल, असे आश्वासनही आमदार गजबे यांनी ग्रामस्थांना दिले.यावेळी प्राचार्य डी. के. मेश्राम, रामहरी चौधरी, प्रकाश लेनगुरे, पांडुरंग गुरनुले, शालिक मोहुर्ले, भाईचंद गुरनुले, माणिक पेंदाम, भामराज हर्षे, गंगाधर ढोक, घनश्याम साखरे, विजय ढवळे, भास्कर उंदीरवाडे, तुकाराम वैरकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
आमदारांनी जाणल्या मानापूर परिसरातील समस्या
By admin | Published: May 15, 2016 1:11 AM